• Sun. May 4th, 2025

किसान पुत्रांचा आक्रोश, ओल्या दुष्काळासाठी ऑनलाईन ट्रेंड, ‘मायबाप सरकार’ आता निर्णय घेण्याची खरंच वेळ आलीये!

Byjantaadmin

Oct 27, 2022

मुंबई : राज्यात यंदाच्या साली खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने आणि परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या नुकसानीनंतर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना फारच आशादायी वाटत होता. त्यामुळे राज्यात १४७ लाख हेक्टर अशा विक्रमी क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. पण याच पावसान पुढे जाऊन शेतकऱ्यांना धोका दिला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. उभी पिकं पाण्याखाली गेली, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. अशा सगळ्या परिस्थितीत शासानाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षांबरोबरच शेतकरी संघटना करत आहेत. ओला दुष्काळ प्रश्नी पक्ष, पार्ट्या, झेंडे यांच्या पलीकडे जात राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांनी पुकारलेला ऑनलाईन ट्रेंड आज मोठ्या प्रमाणात यशस्वी होतोय. बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार, मध्यमवर्गीयांचा या ऑनलाईन ट्रेंडला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने ऑनलाईन ट्रेंडमध्ये व्यक्त होणाऱ्या या उद्रेकाची योग्य दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास रस्त्यावर उतरून आरपारचा संघर्ष करावा लागेल. किसान सभेचे राज्याचे अधिवेशन येत्या ३१ ऑक्टोबर व १ आणि २ नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात होत आहे. केंद्र तसेच राज्याचे नेतृत्व आणि राज्यभरातील निवडलेले ३०० प्रतिनिधी या अधिवेशनासाठी ३ दिवस एकत्र असणार आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पोरांनी आज सुरू केलेल्या ऑनलाईन ट्रेंडची योग्य दखल घेतली नाही तर या अधिवेशनात विचार विनिमय करून राज्यात भव्य आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी राज्य सरकारला दिला आहे.

परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवली असून, शेतीपिकांची नासाडी झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यंदा राज्यभरात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण खरीप पीक हातातून गेले आहे. सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम धोक्यात आलाय. दिवाळी हा खरंतर प्रकाशाचा सण पण अस्मानी संकट ओढावल्याने बळीराजाचा दिवाळसण अंधारात गेलाय. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना निकषांच्या कात्रीत न अडकवता भरीव मदत करावी, अशी मागणी राज्यातले शेतकरी करत आहेत.

दुष्काळ म्हटल्यावर कोरडी जमीन, पाण्याची कमतरता असं चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र ओला दुष्काळ ही संकल्पना कोरड्या दुष्काळाच्या अगदी उलट असते. ठराविक क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतमालाचं मोठ्या प्रमाणात होतं. अतिवृष्टीमुळे पिकं वाहून जातात, शेतातील माती वाहून जाते, जागोजागी पाणी साचतं, यासारख्या परिस्थितीला सामान्यपणे ‘ओला दुष्काळ’ असं म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *