उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यलयात शुक्रवारी (२ जून) प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार कैलास पाटील हे देखील उपस्थित होते.
पण या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या प्रश्नावर खासदार ओम राजेनिंबाळकर चांगलेच आक्रमक झालेले दिसले. जिल्हा परिषदेत काही महिन्यांपासून शिक्षकांच्या रिक्त जागा रिक्त होत्या. या रिक्त जागा का भरल्या गेल्या नाहीत, यावरुन ओम राजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं. सीईओला विचारलं ते म्हणाले, अधिकारीच फायली पाठवत नाहीत. जर शिक्षण अधिकारीच सीईओ साहेबांचं ऐकत नसतील तर कस होणार. जर तुम्ही आयएएस अधिकारी असूनही कर्माचाऱ्यांवर कारवाई करु शकत नाहीत तर प्रशिक्षणात काय शिकलात, खालचे अधिकारी तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही काय करताय. शेवटी मी शिक्षण अधिकारी आणि आयएएस अधिकाऱ्यांनाच बोलणार.
शिक्षकांच्या रिक्त झालेल्या जागा भरा यासाठी आम्ही स्वत:मागे लागलो असताना तुम्ही का या जागा भरल्या नाहीत, सीईओंनी फाईल क्लिअर करुन दिली आणि एक क्लर्क थेट जीआर’च मागतोय कोण आहे तो. सीईओंनी फाईल क्लिअर करुन दिल्यानंतर या रिक्त जागा भरायला तुम्हाला काय हरकत होती. मतासाठी आम्हाला लोकांकडे जावं लागतं पण जर त्यांची कामचं झाली नाहीत तर लोक आम्हाला घरी बसवतील, माझा अंत पाहू नका, १० तारखेच्या आत जर हा विषय क्लिअर झाला नाही तर मला निर्णय घ्यावा लागेल, असा थेट इशाराच ओम राजेनिंबाळकर यांनी दिला.