नाशिक : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटप करताना जिंकेल, त्याची जागा असे सूत्र असायला हवे. तसेच शिवसेनेच्या लोकसभेच्या १८ जागा असल्याने त्या आम्ही लढवणारच असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आगामी निवडणुकीत राज्यात ४० जागा महाविकास आघाडी जिंकेल असाही दावा त्यांनी केला.राऊत हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. ते म्हणाले की, राज्यातील ४८ जागांचा आढावा congress सह सर्वच पक्षांनी घेतला पाहिजे. त्यावरून कोणाची ताकद कोठे आहे हे लक्षात येईल.महाविकास आघाडीतील जागा वाटपावर जाहीर चर्चा करता येणार नाही. मात्र प्रत्येक पक्ष आपल्या जागांचा आढावा घेत आहे. त्यात वावगे असे काही नाही. राज्यात महाविकास आघाडीला ४० जागा जिंकायच्या आहेत, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.लोकसभा निवडणूक जिंकणे हे आमचे लक्ष असून त्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचेही कष्ट आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते, त्या जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढवेल.
संजय राऊतांचे थुंकणे वादात
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत अजून एका वादात सापडले आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच राऊत वार्ताहराच्या माईकसमोर थुंकले; तर शुक्रवारी दुसऱ्यांदा दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारताच राऊत यांनी पुन्हा तीच कृती केली.महाविकास आघाडीतील नेत्यानींही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यानंतर सावरासावर करत ‘माझ्या जिभेला त्रास झाल्याने मी थुंकलो’, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.