• Tue. Apr 29th, 2025

‘काय बी करा पण भविष्यात पॉवरमध्येच राहा…’, भाजप नेते सुभाष देशमुखांची प्रणिती शिंदेंना ‘साद’

Byjantaadmin

Jun 1, 2023

सोलापूर: काहीही करा पण भविष्यात तुम्ही पॉवरमध्ये राहा, त्यासाठी काय शक्ती लावावी लागतेय ती लावा असं वक्तव्य सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार प्रणिती शिंदें  यांना उद्देशून केलं आहे. पॉवर ऑफ सोलापूर या कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी सुभाष देशमुखांनी हे वक्तव्य केलं. एका भाजप आमदाराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरच हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले सुभाष देशमुख? 

आमदार सुभाष देशमुख हे आमदार प्रणिती शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, “गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही एकाच सभागृहात काम करतोय. प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासावर अनेक प्रश्न विचारली आहेत. काहीही करा पण भविष्यात सुद्धा तुम्ही पॉवरमध्ये राहा, तरच सोलापूरचा विकास होईल. मग त्यासाठी कोणती शक्ती वापरायची किंवा युक्ती वापरायची ती वापरा, आम्हाला त्यातलं ज्ञान नाही. त्यासाठी शिंदे साहेबांचे मार्गदर्शन असेल तुम्हाला. प्रणिती शिंदे यांना पुरस्कार देण्यामागे त्यांची पॉवर वाढावी हाच हेतू असणार. आता सुशिलकुमार शिंदे हे म्हणतील की सुभाष काहीही बोलून जातो. म्हणूनच आजकाल जास्त काही बोलतं नाही, बोलणं टाळतो.”

 सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया 

भाजप आमदार सुभाष देशमुखांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सुभाषराव यांना मी धन्यवाद देतो, मला काय बोलायचं होतं त्यांनीच बोललं.

सुभाष देशमुख हे भाजपचे आमदार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. सुभाष देशमुखांनी प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली की भविष्यात काँग्रेस सत्तेत यावं आणि प्रणिती शिंदे यांना पॉवर मिळावी अशा शुभेच्छा दिल्या यावर राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed