पंकजा मुंडे यांनी पक्षाबद्दल केलेल्या एका विधानामुळं राजकीय वर्तुळात सध्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Pankaja Munde on BJP : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेल्या एका कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाबद्दल केलेल्या एका विधानामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या चर्चांना जोर आला आहे. तर, विरोधी पक्षांनीही ऑफर देणं सुरू केलं आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचं औचित्य साधून राष्ट्रीय समाज पक्षानं बुधवारी दिल्लीतील लोधी मार्गावरील सत्यसाई ऑडिटोरियम इथं राष्ट्रीय एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे यावेळी उपस्थित होते.’ताईची पार्टी’ असा उल्लेख काही लोकांकडून करण्यात आला होता. तोच धागा पकडून पंकजा मुंडे यांनी यावेळी भाजपबद्दल वक्तव्य केलं. ‘माझी पार्टी कुठली? मी भाजपची आहे, पण भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. पक्ष माझा होऊ शकत नाही, असं पंकजा म्हणाल्या.’माझं अर्ध लक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षावरच असतं. तुम्ही या विषयावर पत्रकार परिषद घ्या, त्या विषयावर बोला अशा सूचना मी देत असते. राष्ट्रीय समाज पक्ष हे माझं माहेर आहे. इथं वडिलांशी लढाई झाली तर हक्कानं मी भावाच्या घरी जाऊ शकते, असंही पंकजा म्हणाल्या पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावरून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रीय समाज पक्षात जाऊ शकतात, असंही बोललं जात आहे. तर, पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील तर धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळं यात भरच पडली आहे.
भाजप म्हणतो, वक्तव्याचा विपर्यास
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं आहे. मी पंकजाताईंचं पूर्ण भाषण ऐकलं आहे. पक्ष माझ्या पाठीशी आहे असं त्या म्हणाल्या. त्या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणं चूक आहे, असं बावनकुळे म्हणाले.