२१ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याप्रकरणी कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने आरोपीला हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले असून बलात्काराच्या आरोपातून मु्क्त केले आहे.
नवी दिल्ली – कायद्याच्या दृष्टीने एका मृतदेहाला व्यक्ती मानता येत नाही. कायद्यातील कलम ३७५ आणि ३७७ अंतर्गत मृतदेह मानवी व्यक्ती मानले जात नाही. याचा आधार घेत एका आरोपीला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. एका मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहासोबत सेक्स केल्याचा आरोप तरुणावर करण्यात आला होता. या गुन्ह्याखाली आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने हत्या आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध आरोपीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यानंतर ८ वर्षांनी कर्नाटक हायकोर्टाने युवकाला हत्येत दोषी ठरवले परंतु बलात्काराच्या आरोपातून निर्दोष ठरवले. याचे कारण म्हणजे कायद्यात मृतदेहासोबत सेक्स केल्याबाबत शिक्षेची तरतूद नसणे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं की, कायद्याच्या दृष्टीने एका मृतदेहाला व्यक्ती मानले जात नाही. कलम ३७५ आणि ३७७ अंतर्गत मृतदेह मानवी व्यक्ती मानले जाऊ शकत नाही. कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता करत केंद्र सरकारलाही निर्देश दिले आहेत की, येत्या ६ महिन्यात कलम ३७७ मध्ये दुरुस्ती करत एखादा व्यक्ती अथवा प्राणी यांच्या मृतदेहासोबत सेक्स करणे याला शिक्षेची तरतूद करावी. मृतदेहांसोबत संबंध ठेवणे हे कलम ३७७ च्या अंतर्गत आणावे असं सांगितले आहे.
२५ जून २०१५ रोजी कर्नाटकच्या तुमकर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. रंगराजू उर्फ वाजपेयीने गावातील २१ वर्षीय युवतीची हत्या करत तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. ९ ऑगस्ट २०१७ रोजी तुमकर जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने रंगराजूला हत्या आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. १४ ऑगस्टला रंगराजूला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.तर बलात्कारात १० वर्ष कैद आणि २५ हजार दंडाची शिक्षा लावली. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आरोपीच्या वकिलांनी हायकोर्टात आव्हान दिले. आरोपीविरोधात ३७६ चा गुन्हा लागू होत नाही आणि सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा चुकीची आहे अशी याचिका हायकोर्टात करण्यात आली होती