• Mon. Apr 28th, 2025

सीबीआयचा दबाव आहे का?:सचिन तेंडुलकर तुम्ही मूग गिळून गप्प का?

Byjantaadmin

Jun 1, 2023

भारतरत्न सचिन तेंडुलकरजी कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रश्नी तुम्ही मूग गिळून गप्प का? काही महिला लैंगिक अत्याच्याराविरोधात उठवत आहेत. मात्र, तुमच्यातील माणुसकी गेली कुठे? असा खणखणीत सवाल काँग्रेसने केला आहे.

मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने सचिनच्या मुंबईतल्या घरासमोर तसे होर्डिंग लावलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सचिनच्या मौनावर टीका केली होती. आता सचिन यावर तरी काही बोलणार का, हे पाहावे लागेल.

आंदोलन मोडून काढले

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी असताना ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची मागणी करत साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी 23 एप्रिलपासून धरणे आंदोलन सुरू केले. नव्या संसद भवनाच्या उदघाटनादिवशी या इमारतीसमोर महापंचायत भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आंदोलन पोलिसांनी मोडून काढले.

अन् तेंडुलकरवर टीका

खेळाडूंनी आपली पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतकरी नेत्यांनी त्यांचे मन वळवले. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला फिरकीपटू अनिल कुंबळे, बॉक्सर विजेंदर सिंह, भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी पाठिंबा दिला. मात्र, इतर खेळाडूंनी या आंदोलनाची दखलही घेतली नाही. त्यामुळेच सचिन तेंडुलकरवरही टीका होत आहे.

काँग्रेसचे खडे सवाल

सचिन तेंडुलकरच्या घरासमोर मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्ता रंजीता गोरे यांनी मोठे फलक लावले होते. मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला सणसणीत उत्तर तुम्ही दिलं होतं की आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नको… आणि आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे??, असे विचारण्यात आले आहे.

कुठल्या तरी दबावाखाली

सीबीआय… इन्कम टॅक्स या सगळ्यांच्या धाडी पडतील म्हणून तू कुठल्या तरी दबावाखाली आहेस का? क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहेत. मात्र, जेव्हा खेळ विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत, तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही, अशी खंतही काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचीही टीका

महाराष्ट्र सरकारच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चा स्माइल अॅम्बेसेडर म्हणून सचिनची नियुक्ती त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी सचिन तेंडुलकरवर टीका केली होती. त्यांनी एक ट्विट करून म्हटले होतेकी, प्रिय सचिन, हे जाणून आनंद झाला की भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने तुमची राज्याच्या ‘स्वच्छ मुख अभियान’साठी स्माइल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. पण तुम्हाला ते माहित आहे का, भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देण्यासाठी, आमच्या कुस्तीपटूंचे “हसू” हिरावले आहे का, असा सवाल केला होता.

तुम्ही बोलण्याची आशा…

क्लाईड क्रास्टो पुढे म्हणतात की, पैलवान न्याय मागत आहेत, पण भाजप आपल्या खासदाराच्या रक्षणाकडे डोळेझाक करत आहे. तुमच्याप्रमाणेच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूंही आपला अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून आपल्या बंधुत्वाला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. आशा आहे की तुम्ही बोलाल आणि त्यांचे “स्माइल अॅम्बेसेडर” देखील व्हाल, असे आवाहन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed