उस्मानाबाद: शिंदे गटाने बच्चू कडू यांचा विश्वासघात केला आहे. या साऱ्या राजकारणात बच्चू कडू यांचा फुटबॉल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने बच्चू कडू यांच्यासोबत अशाप्रकारे वागायला नव्हते पाहिजे, असे वक्तव्य शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. या सगळ्यामुळे बच्चू कडू यांची राजकारणातील आणि समाजातील पत कमी होईल. बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाऊन स्वाभिमानाशी तडजोड केली होती. बच्चू कडू यांना खरं तर मंत्रिपद मिळायला हवं होतं, अशी टिप्पणीही सुषमा अंधारे यांनी केली. अंधारे यांनी आमदार कैलास पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणस्थळी उपस्थितीत लावली होती.
यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवरही टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपाने गुळाचा गणपती करून ठेवलाय, अशी बोचरी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने बजाज अलायन्स कंपनीला शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही कंपनीने विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कुठे दाद मागायची, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.
गेल्या तीन दिवसांपासून आमदार कैलास पाटील शेतकऱ्याच्या हक्काच्या पिकविमा,अनुदान,नुकसान भरपाईसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. या आंदोलनस्थळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांचे औक्षण करुन भाऊबीज साजरी केली.
बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटात हालचाली
बच्चू कडू यांनी बुधवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.यानंतर शिंदे गटातील हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेत बच्चू कडू यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, केसरकर यांनी कडू (Bacchu Kadu) यांच्यावर आक्रमकपणे आरोप करणाऱ्या रवी राणा (Ravi Rana) यांच्याबाबत कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून बच्चू कडू यांची मनधरणी सुरु आहे की त्यांना अप्रत्यक्षपणे शांत बसण्याचा सल्ला दिला जातोय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दीपक केसरकर यांनी बच्चू कडू यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, असे संकेतही दिले आहेत.
बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोडा संयम ठेवायला हवा, अशी टिप्पणी केसरकर यांनी केला. राजकीय वर्तुळात केसरकर यांच्या या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत.