गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. लग्नापूर्वी अनेक जोडपे एकत्र येत फोटो आणि व्हिडिओसेशन करण्यास प्राधान्य देत आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. परंतु आता अफाट खर्च येणाऱ्या या प्री-वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा ठराव मराठा सेवा संघाने पास केला आहे. सोलापुरात झालेल्या मराठा संघटनांच्या मेळाव्यात याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सुसंस्कृत, कर्तृत्ववान आणि संस्कारी मुला-मुलींची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करा, कशाचीही अपेक्षा न करता, साध्या पद्धतीने विवाह करण्याचं आवाहन मराठा सेवा संघाकडून नियोजित जोडप्यांना करण्यात आलं आहे.
लग्नापूर्वी करण्यात येणाऱ्या प्री-वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा ठराव मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड तसेच अन्य संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता पास झालेला ठराव जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनालाही देण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाच्या प्रतिनिधींनी दिली आहे. त्यामुळं आता लग्नापूर्वी दिमाखदार प्री-वेडिंग शूट करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या लग्नाळूंची गोची होण्याची शक्यता आहे. मराठा सेवा संघाच्या या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील असंख्य वर-वधू आणि पालकांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या एप्रिल महिन्यात नंदूरबार येथील गुरव समाजाने प्री-वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मराठा समाजाकडूनही प्री-वेडिंग शूटवर बंदी घालण्यात आली आहे. प्री-वेडिंग शूटचे फोटो लग्न समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर प्रदर्शित करणे चुकीचं असल्याचंही मराठा संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय प्री-वेडिंग शूटवर होणारा खर्च गरिबांवर करा, तसेच गरजूंना आर्थिक मदत करण्याचं आवाहन मराठा सेवा संघाकडून करण्यात आलं. यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला एकमताने संमती देत ठराव पास केला आहे.