• Tue. Apr 29th, 2025

देशात हुकूमशाहीला सुरुवात? आधी फरफटत गाडीत टाकलं अन् नंतर गुन्हा दाखल; साक्षी मलिकचा सवाल

Byjantaadmin

May 29, 2023

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत रविवारी देशाच्या नव्या संसद भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा होत असताना दुसरीकडे या भवनाच्या साधारण दोन किमी अंतरावर संघर्ष उफाळून आला. लैंगिक शोषणप्रकरणी आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अन्य आघाडीचे कुस्तीगीर सुरक्षा कवच भेदून ‘महिला महापंचायती’साठी नव्या संसद भवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना फरफटत नेत आपल्या वाहनात बसवलं. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांना धक्काबुक्की करत बसमध्ये ढकलण्यात आले. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातून संतापाचा सूर व्यक्त करण्यात आला. मात्र या खेळाडूंच्या मागण्या मान्य करणं तर दूरच पण दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केल्याची संतापजनक बाबत समोर आली आहे.

Sakshi Malik

दिल्ली पोलिसांनी रविवारी रात्री साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसंच दिवसा या खेळाडूंचं आंदोलन चिरडल्यानंतर रात्री आंदोलनासाठी पुन्हा जंतर-मंतर मैदानावर आलेल्या इतर काही खेळाडूंना परवानगी नाकारत पोलिसांनी तिथून निघून जाण्यास भाग पाडलं.
देशात हुकूमशाही आली आहे का?

पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडल्यानंतर साक्षी मलिकने सरकारला संतप्त सवाल केला आहे. ‘लैंगिक शोषण करणाऱ्या बृजभूषणविरोधात गुन्हा नोंद करून घ्यायला दिल्ली पोलिसांना सात दिवस लागले आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सात तासही लागले नाहीत. या देशात हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे का? सरकार आपल्या खेळाडूंसोबत कसं वर्तन करतंय हे अख्खं जग बघत आहे,’ असं ट्वीट साक्षी मलिकने केलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीगीरांनी २३ एप्रिलपासून जंतर मंतरवर आंदोलन पुन्हा सुरू केले. या आंदोलनाचा भाग म्हणून कुस्तीगीरांनी नव्या संसद भवनासमोर रविवारी ‘महिला सन्मान महापंचायती’चे आयोजन केले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर सुरक्षा वाढवली. मात्र तरीही कुस्तीगीर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड विनेश आणि तिची चुलत बहीण संगीता फोगट यांच्या नेतृत्वाखालील कुस्तीगीरांनी हटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तणाव वाढला. ‘पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांना जबरदस्तीने बसमधून विविध ठिकाणी पाठवण्यात आले,’ असे कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले.

‘कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असेही ते म्हणाले. पोलिसांनी यानंतर कुस्तीगीरांचे सामान हटवले. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी त्यांना पुन्हा येण्यास परवानगी मिळणार नसल्याचे यावरून दिसते. परंतु याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. ‘आरोपी मुक्तपणे वावरत आहे. त्याला सरकार आसरा देत आहे आणि देशासाठी पदके मिळवणाऱ्या आम्हा कुस्तीगीरांना देशातील मुलींसाठी न्याय मागितल्याने कारागृहात टाकले जात आहे,’ अशी प्रतिक्रिया विनेशने व्यक्त केली. ‘हे पाहून मला खूप दु:ख होत आहे. हे प्रकरण हाताळण्यासाठी योग्य मार्ग असायला हवा,’ असे भारताचा ऑलिम्पिकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed