शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाची राज्यव्यापी बैठक पुणे येथे संपन्न
पुणे;-दुर्गराज रायगडावर ६ जून रोजी संपन्न होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त उत्सव मूर्तीला शुध्द सोन्यापासून बनविलेल्या ३५० सुवर्ण होनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाची राज्यव्यापी बैठक पुणे येथे संपन्न झाली. यावेळी बैठकीला राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, गडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व नियोजन करण्यात आलेले आहे.
यावर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून निर्माण करण्यात आलेल्या सुवर्ण होनांच्या ३५० प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून, या प्रतिकृतींचा सुवर्णाभिषेक श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीवर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत सुवर्णपेढी असलेल्या ‘चंदूकाका सराफ’ यांच्या वतीने या प्रतिकृती देण्यात आलेल्या आहेत, प्रतिवर्षी १ सुवर्णहोन प्रतिकृती यामध्ये वाढविण्यात येणार आहे.
सोहळ्याच्या निमित्ताने गडावर ५ जून व ६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी अन्नछत्र, निवाऱ्याची सोय, तात्पुरती स्वच्छतागृह, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, शटल बस सेवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी याची सोय करण्यात आली आहे.उपस्थित शिवभक्तांनी यावेळी अनेक सूचना केल्या, या सूचनांची दखल समितीकडून घेतली गेली असून योग्य सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बऱ्याच शिवभक्तांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावर्षी नाणे दरवाजा ते महादरवाजा या शिवकालीन राजमार्गाने शिवभक्तांनी यावे, यामार्गाचे जतन व संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे, युवराजकुमार शहाजीराजे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, समितीचे सर्व कमिटी प्रमुख, इतर पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.