नगर/ पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी असे प्रतिपादन केले, तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर सरकार पडेल, त्यामुळे विस्तार होत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला उत्तर देताना नाना पटोले व संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत, तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात. आम्हाला खूप कामे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही, असे म्हणत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या आरोपाबाबत विचारताच, कोण संजय राऊत, असा प्रतिसवाल करत फडणवीस यांनी राऊत यांची खिल्ली उडविली.
अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार -केसरकर
पुणे : गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले. अधिवेशन तोंडावर येते त्या वेळी प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाची तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार
हे शंभर टक्के आहे. नेमकी तारीख मला काही सांगता येणार नाही; परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित आहे, असे केसरकर यांनी सांगितले. जी-२० परिषदेच्या शिक्षण समितीची पुण्यात होणारी बैठक, शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीसाठी केसरकर पुण्यात आले होते. खातेवाटपासंदर्भात केसरकर म्हणाले की, मंत्र्यांना दिलेल्या विभागांव्यतिरिक्त उर्वरित विभाग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे कोणाला कोणता विभाग द्यायचा, विभागांचे मंत्री बदलायचे का, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील.