• Thu. May 1st, 2025

लोकनेते विलासराव देशमुख : सामाजिक ऐक्याचा विकास मार्ग

Byjantaadmin

May 26, 2023
Hon. CM Mr. Vilasrao Deshmukh addressing the Janata

लोकनेते विलासराव देशमुख : सामाजिक ऐक्याचा विकास मार्ग

माजी मुख्यमंत्री व माजी केद्रींय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची २६ मे रोजी ७८ वी जयंती आहे. आज आपल्या सर्वांना पावलोपावली त्यांचे स्मरण होते. लोकशाहीत लोक आपला नेता निवडत असतात पण एखादा नेता स्वकर्तत्वाने लोकांच्या गळयातील ताईत बनतो. आदरणीय विलासराव देशमुख यांनी बाभळगावचे सरपंच, लातूरचे आमदार, राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री, राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री, केंद्रियमंत्री या पदावर राहून सामान्य माणसासाठी केलेल्या कामामुळे आज आपण त्यांच्याकडे लोकनेता म्हणून पाहतो.
या परिसरातील जनजीवन म्हणजे यात्रा, जत्रा, उरूस, गावकी, भावकीत यात मग्न असलेला समुदाय या सर्व शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातल्या युवकांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना नवे पंख उपलब्ध करून देण्याचं फार मोठ कार्य आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी केले आहे. सरपंच, चेअरमन, सभापती, आमदार अनेक जण होतात पण पूढे मोठी झेप तेच घेतात ज्याच्याकडे लोकसेवत काही करण्याची तळमळ आहे. ही बांधिलकी आणि तळमळ होती आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या ठायी. महाराष्ट्र त्यांनी समजून घेतला, मराठवाडयाचे मागासलेपण ओळखले आणि लातूरला पूढे घेऊन जाण्याचा मार्ग स्विकारला. यातूनच विलासरावजीच एकएक पद वाढत गेल लातूर विकासाच्या शिखरावर पोहोचले.
ग्रामीण भागाशी नाळ असलेल आणि येथील समस्यांची जाण असलेल विलासरावजीचं नेतृत्व होतं. त्यांच्यामध्ये काही गुण तर विशेष होते. सार्वजनीक जीवनात वावरत असतांना राज्यात असो वा देशपातळीवर त्यांचे लक्ष लातूरकडे कायम असायचे. मांजरा परिवारातील कारखान्याचे दैनदीन ऊस गळीत अहवाल असो, मांजरा धरणाची पाणी पातळी, लातूरची पिकपाणी परिस्थितीचे नित्य अवलोकन करित असत. आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांचा संसार अवंलबून असलेल्या सर्व संस्थेतील कामकाजावर त्यांचे बारकाइने लक्ष होते. यामुळेच या सर्व संस्थाचे आजही आदर्श कामकाज सुरू आहे.
लोकहिताचे ऐतिहासीक निर्णय
लोकनेते विलासराव देशमुख यांनी लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, यातील अनेक लोकोपयोगी निर्णय ऐतिहासीक ठरले आहेत. यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमधील शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, वीजबील माफी, कर्जाचे पुर्नगठन, व्याजात सवलत, फलोत्पादन विकासासाठी दिलेली नुकसान भरपाई, दुष्काळी परिस्थितीत केलेल्या उपाययोजना, अवकाळी व गारपीट नुकसान भरपाई दिलेले अनुदान, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलेले विशेष पॅकेज, पशुधन जगविण्यासाठी केलेल्या उपाययोजना, शेती आणि शेतकरी यांच्यासाठीचे निर्णय महत्वपूर्ण ठरले आहेत. याशिवाय काहीवेळा पिकांचे उत्पादन जास्त झाल्याने भाव कमी झाल्यास हमीभावाने माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्राचा कांदा उत्पादक, काळी ज्वारी उत्पादकांना फायदा झाला. त्यांनी शेतक­यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय पायाभूत ठरले आहेत. किंबहूना येणाऱ्या काळात शेती आणि शेतकऱ्यांसाठी काही चांगले करायचे असेल तर त्यांनी हे घेतलेले निर्णय भावी राज्यकर्त्याना सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहेत.
लोकांचा लोकनेता
विलासरावजी देशमुख यांनी ज्या ज्या पदावर कार्य केले. त्या पदाच्या माध्यमातून आपल्या भागातील लोकांचं आणि राज्यातील लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी विधायक काम केले, विविध विकासाच्या योजना राबविल्या. राजकारणात असले तरी प्रारंभीपासून निवडणूकी पुरते राजकारण आणि त्यानंतर फक्त विकासाचं काम करणे हेच सुत्र त्यांनी पाळले. त्यांच्या या विलक्षण नेतृत्वामूळे शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. सहकार, कृषी, सिंचन, उदयोग व्यवसाय, मुलभूत सोयीसुविधांच्या विकासातून आर्थिक क्रांती झाली. यामुळे त्याच्या नेतृत्वाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे.
अवीट गीत गाणाऱ्या लतादीदी आणि आशाजी यांचा आवाज होता कोकीळवाणी, विलासरावजींनी शेवट पर्यंत लोकांच जगण मांडल म्हणून ती होती लोकवाणी. त्यांच्या भाषणाची बोली लोकांच सुख-दु:ख मांडणारी भाषा होती. बहूजन हिताय, बहूजन सुखाय हा विचार त्यांनी मांडला, म्हणून लोकशाहीत त्यांचे विचार चिरंतन आहेत.
सामाजिक ऐक्याचा विकास मार्ग
असं म्हणतात माजी केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण देशात कुठेही त्यांच्या अंगावरून झूळूक वाहून गेली तरी ते म्हणत हा सह्रयाद्रीचा वारा आहे. अगदी असेच आदरणीय विलासराव देशमुख जगभर वावरतांना कुठेही नवीन पाहिल की, त्यांना वाटायच जे नवं ते लातूरला हवं. ही सामान्यासाठी बांधीलकीची भावना त्यांच्याकडे होती. मराठवाडयातील लातूर जिल्हा हा मागासलेला होता पण एक चांगली वैचारीक चळवळीची परंपरा लाभलेला हा भाग होता. विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. एक चांगली सामाजिक सलोख्याची परंपरा येथे आहे. ही विचारधारा येथील प्रगतीला पोषक ठरली. लातूर जिल्हा झाल्यानंतर विलासरावजी देशमुख यांचे नेतृत्व लाभले, यामूळे येथे सहकार, कृषि, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, व्यापारास चालना मिळाली, लातूरची प्रगती सर्व क्षेत्रात झाली. या काळात मिळालेल्या सत्तेचा वापर विलासरावजींनी लोककल्याणासाठी केला.
विकास आणि चांगल्या कामाच्या माध्यमातून सर्व लोकांना त्यांनी जोडले. समाजातील सर्व माणसे सारखी आहेत. सर्वांचा विकास झाला तर हे सगळे एका माळेत ओवले जातील. हा नवा विचारांचा प्रकाश घराघरात, प्रांताप्रातांतून संपूर्ण राष्ट्रात जातो. विकासाचा मार्ग समाजाच्या भावनीक एकतेचा मार्ग होतो, अशी विधायक सामाजिक ऐक्यांची दृष्टी त्यांच्याकडे होती. यातूनच चांगले काम सुरू असेल तर लोक सोबत येण्यासाठी खारीचा वाटा उचलतात असे सहकारी विलासरावजींना या काळात लाभले.
सर्वागीण विकासाचे शिल्पकार
विलासरावजींचे लातूर आणि लातूरकरांवर अतोनात प्रेम होते. राजकीय जीवनात काम करतांना ‘जे नवं ते लातूरला हवं’ ही ब्रीदच पाळले. आज लातूर जिल्हयाचा जो सर्वागीण विकास झाला आहे, याचे शिल्पकार तेच आहेत. विकासाचा पहिला घास लातूरला देणार या धोरणातून अनेक योजना मार्गी लागल्या. पाहता पाहता लातूर जिल्हा देशाच्या नकाशावर आला. येथीन दुष्काळ हटवण्यासाठी बॅरेजेस उभारणीतून दुष्काळातुन मुक्ती मिळाली आणि अमृतधारा थांबल्या मांजरातीरी एवढ मोठे कार्य झाले आहे. जिल्हा पोलीस विभाग त्यांनी अदययावत केला, मांजरा कारखानाच्या रूपाने सहकार चळवळ रूजवली, जिल्हा परिषदेची तीन मजली इमारत, शहरातील ४३ प्रशासकीय कार्यालये एक छताखाली आणली, नवीन जिल्हा शासकीय रुग्णालयास मंजूरी, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि अदययावत शासकीय रूग्णालय उभारणी केली, गाव तेथे बस गाडी योजना राबविली. लातूर येथे कृषी महाविद्यालय व उदगीर येथे पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. विविध विभागीय कार्यालये लातूरात आणली. लातूरला व्यापार व व्यवसायाचे प्रमुख शहर करण्यासाठी दळणवळण साधने यामध्ये रेल्वे, विमानसेवा व राष्ट्रीय महामार्गाची जोडणी केली, ही वानगी दाखल सागितलेली विकासकामे आहेत, एक ना अनेक अशी शेकडो काम त्यांनी केली आहेत.
सहकारातून समृध्दीचा पाया
मराठवाडा विभागातील मागासलेपण आणि लोकांची गरीबी, अज्ञान हा विकासातील गतीरोध होता. सर्वांना सोबत घेऊन पूढे जायच तर सहकार चळवळ हाच विकासाचा मार्ग आहे, हे ओळखून विलासराव देशमुख यांनी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना माध्यमातून आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचा विस्तार करून सहकार चळवळीचे जाळे येथे त्यांनी घटट विणले. या सहकार आणि साखर उदयोगातून लोकांची सर्वागीण प्रगती झाली आहे. आपण पाहतो अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे सहकार आणि साखर उदयोगाचा पाया रचला गेला. पण खऱ्या अर्थाने या क्षेत्राचा कळस पाहवयाचा असेल तर लातूरलाच याव लागेल. हे लोकोत्तर कार्य त्यांच्या नेतृत्वाची पावती आहे. कारण या साखर उदयोगातून ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन झाले. यातून आधुनिक शेती, कृषी यांत्रीकीकरण योजना, ऊसविकास योजना, विविध सिंचन योजना येथे आकाराला आल्या.
मराठवाडा, लातूर म्हणजे दुष्काळ, गरिबी आणि अठराविश्व दारिद्रयातील काळरात्रीचा प्रवास पण या अंधरातील मंगलमय उष:काल म्हणजे विलासराव देशमुख होय. एवढे मोठे कार्य त्यांना सहकार चळवळीतून उभा केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास
आपण पाहतोय गेल्या आठ-दहा वर्षापासून शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस पिकास भाव नाही म्हणून घरात आहे. शेतात पिकलेले कांदे, टमाटे, भाजीपाला याला देखील भाव नाही म्हणून रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशा प्रसंगी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविणारे विलासराव देशमुख प्रकर्षाने आठवतात. शेती, सहकार, ग्रामविकास, ग्रामीण भागातील जनजीवन बदलण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. राज्यातील शेतकऱ्यासाठी मंत्रालय म्हणजे कृषीपंढरीच ठरली होती. २१ टीएमसी पाणी मंजूरी, कर्जमाफी, कृषी यांत्रीकीकरणास अनुदान, ऊसविकास योजना, इथेनॉल धोरण, अपारंपारीक ऊर्जा धोरण, आजारी साखर कारखान्याना मदत, कृषी प्रक्रिया ऊदयोगाला चालना, कृषी संशोधन संस्थांना भरीव मदत, बाजार समिती अद्ययावत करणे, कृषी माल तारण योजना, शेती स्वावलंबन मिशन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र यासारखे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले, योजना राबविल्या या योजना कृषीविकासाला दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत.
एक बहूश्रुत नेतृत्व
ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती अशा अनुभवांतून तरुण वया पासून विलासरावजी देशमुख यांचे नेतृत्व घडत गेले. आपल्या कार्यकाळात एक असामान्य कर्तृत्वाने त्यांनी नेतृत्वाच ठसा उमटवला. त्या काळात शरद पवार यांच्यासह दिग्गज नेतृत्वाच्या बरोबरीने या नेत्याची चर्चा होत असे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातले आजचे सगळे दिग्गज नेते- ज्यात शरद पवारसुध्दा आहेत – एका व्यासपीठावर असतील तर त्या समारंभात सगळया भाषणांत सरस भाषण आणि सगळयात जास्त टाळया घेण्याची ताकद विलासरावांच्या वक्तृत्वात होती. एक बहूश्रुत नेतृत्व अशी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची ओळख होती. सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात रसिकतेने भाग घेत, मनमुराद आनंद लुटत. सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी खूप चांगले काम केले. लेखक, कवी, नाटककार, कलाकारांना प्रोत्साहन दिले. त्यांचा बहुमान केला. त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील लोकांचाही मानाचा सलाम आहे.
आज विलासरावजी देशमुख या नेतृत्वाची जयंती आहे,
वक्तृत्वात होते ओज
कतृत्वानी लाभले तेज.
त्यांना विनम्र अभिवादन…!
चौकट :
समाजातील सर्व माणसे सारखी असतात त्यांचा विकास झाला की, सगळे एका माळेत ओवले जातील. हा नवा विचारांचा प्रकाश संपूर्ण राष्ट्रात जातो. विकासाचा हा मार्ग समाजाच्या भावनीक एकतेचा मार्ग होतो, अशी विधायक सामाजिक ऐक्यांची दृष्टी त्यांच्याकडे होती. यातूनच चांगले काम सुरू असेल तर लोक सोबत येण्यासाठी खारीचा वाटा उचलतात असे जीवाभावाचे सहकारी विलासरावजींना त्या काळात लाभले आज त्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन…!

राहूल हरिभाऊ इंगळे पाटील
रा.करकट्टा ता.जि.लातूर
मो. ९८९०५७७१२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *