भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्यात वादाच्या ठिणग्या पडताना दिसत आहेत. भाजपकडून समान वागणूक मिळत नाही, अशा तक्रारी काही खासदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केल्यात.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांची बुधवारी रात्री उशिरा बैठक घेतली. यावेळी नेते आणि उपस्थित खासदारांनी भाजविरोधातल्या तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते.
सारेच आलबेल नाही
येणाऱ्या काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत. त्याची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्यातही यावरून मोठा भाऊ, छोटा भाऊ, कोण-कोणत्या जागा लढवणार याचे दावे आणि प्रतिदावे करणे सुरू आहे. त्यातच शिंदे गट आणि भाजपमध्येही सारेच काही आलबेल नसल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत हे सारे समोर आले.
समान वागणुकीचा मुद्दा
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक घेतली. यावेळी खासदारांसह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, त्यांनी भाजपविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते. केंद्र सरकारने शिंदे गटाला राज्यातल्या सत्तेत सहभागी करून घेतले. अनपेक्षितरित्या मुख्यमंत्रीपद मिळाले. मात्र, तरीही शिंदे गटाचे खासदार आणि नेते नाराज असल्याचे समजते. राज्यातल्या सत्तेत भागीदार म्हणून समान वागणूक मिळत नसल्याची खंत यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
निधी वाटपाच्या तक्रारी
शिंदे गटाच्या खासदार आणि नेत्यांनी निधीवाटपातही दुजाभाव होत असल्याचा यावेळी आरोप केल्याचे समजते. ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी आम्हाला अधिक निधी मिळावा. समान वागणूक मिळावी. आम्ही भाजपचा एक भाग असूनही आम्हाला बरोबरीने वागवले जात नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
आमचा प्रचार करा
विधानसभा आणि लोकसभा जागावाटपाचा मुद्दाही यावेळी चर्चिला गेल्याचे समजते. त्यात आमच्या जागांना धक्का लागू नये, अशी मागणी खासदारांनी केली. शिवाय निवडणुका लागल्यानंतर आमच्या जांगाच्या प्रचारात भाजपने सक्रिय रहावे. एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा भाजप पक्षश्रेष्ठी आणि नेतृत्वाकडे मांडावा, असे साकडे त्यांना घालण्यात आले.
मुंबई, ठाणे अजेंड्यावर
येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यात मुंबई आणि ठाणे महापालिकेवर आपलीच सत्ता मिळवण्याचा निर्धार शिंदे गटाच्या नेत्यांनी बैठकीत केला. ठाकरे गटाला मात कशी द्यायची, याची रणनीतीही आखण्यात येत असल्याचे समजते.खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर हे प्रचारात झोकून देणार असल्याचे समजते.