देशाच्या नव्या संसदभवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी होत आहे. मात्र, आता या संसदभवनाच्या इमारती उद्घाटनावरुन मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी बहिष्कार अस्त्र उपसलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटासह तब्बल १९ पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मोदी सरकार कडून नवीन संसद उद्घाटनाची घोषणा करण्यात आल्यापासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करु नये अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करावं असं म्हटलं आहे.यावरुनच काँग्रेसनं या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे. आता राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटानेही महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नवीन संसदभवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर आत्तापर्यंत १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल, सीपीएम (CPM) आणि सीपीआय (CPI)यांसह इतरही अनेक पक्षांचा समावेश आहे. यावेळी विरोधकांनी 28 मे रोजी पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन व्हावी अशी बहुतांश विरोधी पक्षांची इच्छा आहे. राष्ट्रपती संसदेचे प्रमुख असतात, म्हणून राष्ट्रपतींना आमंत्रित करावे, असे बहुतांश विरोधी पक्षांचे मागणी करत आहे.
आम आदमी पक्षाकडूनही मंगळवारी संध्याकाळी नवीन संसद भवना च्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्यावतीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींना उद्घाटन समारंभाला का बोलावले जात नाही, असा सवाल उपस्थित करुन विरोधकांनी हा निर्णय घेतला आहे.
तृणमूलचा मोदी सरकारवर निशाणा…
तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावरुन सांगितले आहे की, तृणमूल नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नाही.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मोदी यांच्याकडून सर्व काही ‘मी’, माझे आणि मी एवढ्यावरच त्यांनी जोर लावला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, संसद भवन ही केवळ इमारत नसून ती परंपरा, मूल्ये, आदर्श आणि नियम यांची स्थापना असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रपतींना का डावललं याचं उत्तर द्यावं? राऊतांचा घणाघात
संजय राऊत म्हणाले की, या देशाची संसद अजून १०० वर्षे चालली असती. आपल्यापेक्षाही जुन्या इमारती जगामध्ये आहेत. नव्या संसद भवनाची गरज होती का? देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावलण्यात आलं? एका आदिवासी महिलेल्या डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो 28 तारीखला कार्यक्रम आहे.काँग्रेससह सगळ्या विरोधीपक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. तसेच सत्ताधारी पक्षानं राष्ट्रपतींना का डावललं याचं उत्तर द्यावं असंही राऊत म्हणाले. तसेच राष्ट्रपतींना डावलून संसदेचं उद्घाटन होतंय, ही लोकशाही चिंतेची गोष्ट आहे. संसद भवनाचं उद्घाटन देशाच्या राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हायला हवं असंही राऊत यांनी म्हटले आहे.
अशी आहे नवीन संसद इमारत….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या कामाचा शुभारंभ केला होता. १२०० कोटी रुपये खर्च करुन चार मजल्यांची इमारत उभी राहिली आहे. यामध्ये लोकसभेच्या ८८८ आणि राज्यसभेच्या ३८४ सदस्यांसाठी सदस्यांना बसण्याची व्यवस्था होणार आहे. फक्त २८ महिन्यांमध्ये ही इमारत बनून सज्ज झालीय.