मुंबई : सर्वोच न्यायायलयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे विस्ताराच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे इच्छुकांनीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी भाष्य करण्याबरोबरच आपलाही मंत्रिमंडळात समावेश होणारच असल्याचे दावेही करायला सुरुवात केली आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला आता जवळपास ११ महिने पूर्ण होत आले असून, या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यामुळेच विस्ताराला खीळ बसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता न्यायालयानेही यासंदर्भातील निकाल देताना आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा विधानसभाध्यक्षांकडे सोपवला आहे. साहजिकच आता विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितल्याने विस्ताराच्या बातम्यांना अधिक बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे. मंत्री बनण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी तर विस्ताराविषयी तसेच आपला मंत्रिमंडळात कसा सहभाग होईल याविषयी दावेही करायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणी दूर झाल्या आहेत, जे मंत्रिपद मिळेल त्याला पूर्ण न्याय देऊ, तसेच असे शिवसेना नेते भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर माझे नाव दरवेळी चर्चेत असते, असे सूचक विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केले आहे.
या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्तार करण्याची पूर्ण तयारी आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, भाजपकडून हिरवा कंदील येताच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या महिन्यामध्ये दोन वेळा प्रोटोकॉल विभागाला सूचना देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान लातुर जिल्ह्यातील भाजपचे 3 आमदार असून लातूरला या वेळी संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे