• Thu. May 1st, 2025

महाराष्ट्रातून २०२२ मध्ये बेपत्ता ५३५ महिला काय प्रकार? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या…

Byjantaadmin

May 24, 2023

ठाणे:-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या महिला-मुलींना मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याची भीतीही व्यक्त केली. काही एजंट नोकरीचं आमिष देऊन या महिला-मुलींना आखाती देशात नेतात आणि तिथं त्यांचे मोबाईल-कागदपत्रे जमा केली जातात, असाही आरोप रुपाली चाकणकर यांनी केला. त्या ठाण्यात जनसुनावणी घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “पुण्याच्या घटनेनंतर मी पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्तालयात अशा घटनांची माहिती विचारली. तेव्हा अशी एखादीच घटना आहे. २०२२ मध्ये ५३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील मुली-महिलांची मानवी तस्करी झालेली असू शकते. ती शक्यता नाकारता येणार नाही. पुण्यात एक घटना घडली. ते कुटुंब मला येऊन भेटलं आणि त्यामुळे माझ्याकडे ही आकडेवारी आली.”

“बेपत्ता महिलांचे सर्व प्रकार लव्ह जिहादचे वाटतात का?”

“बेपत्ता महिलांचे सर्व प्रकार लव्ह जिहादचे वाटतात का?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता रुपाली चाकणकरांनी स्पष्टपणे नकार दिला. त्या म्हणाल्या, “हे प्रकार लव्ह जिहादचे अजिबात वाटत नाही. लॉकडाऊनच्या काळात घरातील वडील किंवा भाऊ अशा कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. त्यामुळे काही महिला मुलींना व्यावसाय-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावं लागलं.”

“चांगली नोकरी देण्याचं आमिष देत महिलांची फसवणूक”

“या काळात काही एजंटच्या माध्यमातून नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं. आम्ही तुम्हाला चांगली नोकरी देऊ असं सांगण्यात आलं आणि त्यावेळी नोकरीची गरज असल्याने या महिला मुलींनी एजंटकडे नावनोंदणी केली,” अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली.

“एजंटने महिला-मुलींना आखाती देशात नेलं आणि मोबाईल-कागदपत्रे जमा केले”

“एजंट त्यांना जेव्हा आखाती देशात घेऊन गेले तेव्हा विमानतळावरच त्यांची कागदपत्रे, मोबाईल जमा करून घेतले. या सर्व महिला मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या,” असा आरोप रुपाली चाकणकरांनी केला.

राज्याच्या मंत्रीमंडळांमध्ये एकही महिला मंत्री नाही, हे दुदैव; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले मत

 

राज्याच्या मंत्रीमंडळांमध्ये एकही महिला मंत्री नाही, हे दुदैव आहे. किमान महिला बाल कल्याण विकास विभागाच्या मंत्री तरी महिला असायला हव्या होत्या. पण, तिथेही पुरुष मंत्री आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मासिक पाळी तसेच इतर समस्या मांडायच्या कशा असा प्रश्न महिलांपुढे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच ठाणे जिल्ह्यात महिला तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यातही कौटुंबिक समस्यांच्या तक्रारींचे प्रमाण मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *