नवी दिल्ली:-या वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी मंत्रिमंडळात अखेरच्या फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. १० जूनपूर्वी हा फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही अपवाद वगळता वयस्कर आणि केडरच्या बाहेरील मंत्र्यांना पदमुक्त केले जाईल. वर्षअखेरपर्यंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणूक आहे. कर्नाटकमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपसमोर या राज्यांत मोठे आव्हान असेल. कर्नाटकप्रमाणेच या राज्यांमध्येही भाजपकडे दिग्गज नेते नाहीत.
निवडणूक होत असलेल्या राज्यांचा कोटा वाढू शकतो
मंत्रिमंडळात वयस्कर मंत्री आणि केडरच्या बाहेरील लोकांच्या जागी तरुण आणि मूळ केडरच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळू शकते. पाचही राज्यांतील मंत्र्यांच्या कोट्यात वाढ होऊ शकते. मित्रपक्षातील लोकांनाही स्थान मिळू शकते.