कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या प्रगतीसाठी बांधील-चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
आगामी गळीत हंगामासाठी निलंगेकर कारखान्याचे 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट
निलंगा/प्रतिनिधीः- तालुक्यातील अंबुलगा येथे असलेल्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार शुगर्स प्रा.लि.च्या माध्यमातून शेतकर्यांची प्रगती होऊन परिसराचा कायापालट व्हावा असा मानस माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलेला आहे. तो मानस पुर्ण करण्यासाठी आणि कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आपण बांधील असल्याची ग्वाही देत चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी आगामी गळीत हंगामासाठी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार साखर कारखाना प्रा.लि.युनिटने 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती दिली आहे.
निलंगा व परिसराचा कायापालट व्हावा आणि शेतकर्यांची प्रगती होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी अंबुलगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना उभा केला होता. मात्र हा कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बंद पडलेला होता. तब्बल बारा वर्षानंतर हा कारखाना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांनी भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. ओंकार कारखान्याने आपला पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडलेला असून शेतकर्यांनी दिलेल्या ऊसाची बिलेही अदा केलेली आहेत असे चेअरमन बोत्रे पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांना अधिकचा भाव देता यावा आणि निलंगा मतदारसंघाचा कायापालट व्हावा तसेच परिसरातील युवकांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने कारखान्याची गाळप क्षमता 3500 मे. टन वाढविण्यात येत आहे. त्याचबरोबर कारखाना परिसरात डिस्टीलरी प्रकल्प, बायोगॅस सीएनजी प्रकल्प, सेंद्रियखत प्रकल्प व पेट्रोलपंप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. या प्रकल्पांचे भुमिपुजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आगामी गळीत हंगामाच्या वेळी हे प्रकल्प सुरु करण्यात येतील असेही यावेळी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले.
कारखाना शेतकर्यांच्या हितसासाठी आणि आर्थिक प्रगतीकरीता उभारला गेला असल्याची जाणीव ठेवत आणि माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलेल्या मानस नुसार आणि त्यांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी आपण बांधील असल्याचे सांगत चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी कारखाना केवळ आणि केवळ शेतकर्यांच्या हितासाठी चालविला जाणार असल्याचे सांगून या कारखान्याला कोणत्याही राजकारणाचा स्पर्श लावू दिला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगानेच आगामी गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने आणि अधिक गतीने चालविण्याचा संकल्प केलेला असून या हंगामात 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवली असल्याची माहिती चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने 2023-24 च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी, वाहतुक कराराचे पुजन करण्यात आले असून या गळीत हंगामासाठी संपुर्ण नियोजन केले असल्याचे सांगितले.
कारखाना अधिक गतीने व यशस्वीपणे चालविण्यासाठी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोलाचे सहकार्य करत असल्याचे सांगत चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी शेतकर्यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास अधिक दृढ करत त्यांची प्रगती करण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोठेही कमी पडणार नाही असे सांगितले.