एकीकडे नववधू श्रृंगार करून वरात येण्याची वाट पाहत होती. घरातील सदस्यही लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. सगळ्यांच्या नजरा दारावर खिळल्या होत्या. मंडप सजवण्यात आला होता. दरवाजा झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. पण ऐनवेळी नवरदेव लग्न मंडपातून पळाल्याची खबर नवरीच्या घरच्यांना मिळाली. मग काय नवरीसह तिच्या कुटुंबीयांनी त्याचा तब्बल 20 किमीपर्यंत पाठलाग केला. त्याला धरून रस्त्यातच एका मंदिरात त्याच्याशी लग्न केले. या घटनेची पंचक्रोशित खमंग चर्चा रंगली आहे.
हे प्रकरण बरेलीच्या बारादरी पोलिस ठाणे हद्दीतील जुन्या शहराशी संबंधित आहे. या परिसरातील तरुणीचे बदायूं जिल्ह्याच्या बिसौली येथील तरुणासोबत अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. त्यांच्या संमतीने लग्नाची तारीखही ठरली. गत रविवारी भूतेश्वरनाथ मंदिरात मुलीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाची सर्व तयारीही करण्यात आली. नवरी नटून थटून आपल्या नवरदेवाची वाट पाहत होती.
पण वराने अचानक लग्न करण्याचा आपला इरादा बदलला. तो नवरी बरोबर लग्न करण्यास नकार देऊ लागला. त्यानुसार संधी मिळताच तो तेथून पळून गेला. दुसरीकडे मंदिराच्या मंडपात नटून बसलेल्या नववधूला हा प्रकार समजला. तिने आपल्याला प्रियकराला फोन केला. त्यानंतर तरुणाने आईला आणण्याचा बहाणा करून बदायूंला निघाला.
वधूने 20 किमी पाठलाग
आपला प्रियकर आईला आणण्यासाठी बदायूंला जात असल्याचे वधूला समजले. यामुळे तिला वर पळून जात असल्याचा संशय आला. त्यानंतर तिने वेळ न दवडता त्याचा पाठलाग सुरू केला. त्याला बरेली शहरापासून 20 किमी अंतरावरीवल भामोरा पोलिस ठाण्यापुढे पकडले. त्याला बळजबरीने बसमधून मंडपापर्यंत नेण्यास सुरुवात केली. तबब्ल 2 तास हे नाट्य सुरू होते. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी तेथेही गर्दी जमली होती.
त्यानंतर कुटुंबीयांनी आपसात चर्चा करून प्रकरणावर पडदा टाकला. अखेर भामोरा मंदिरातच दोघांचा विवाह पार पडला. नवरीने भामोरा येथे प्रियकराला पकडले तेव्हा मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्यानंतर या प्रकरणी तरुण व तरुणीच्या कुटुंबीयांनी सहमती दर्शवून भामोरा येथीलच एका मंदिरात विवाह सोहळा पार पाडून दोघांचे लग्न लावून दिले.
वधूने धाडस दाखवले
बरेलीमध्ये पहिल्यांदाच एका नववधूने आपल्या प्रियकराला लग्नाच्या मंडपात आणण्यासाठी एवढे धाडस दाखवले. ती 20 किलोमीटर बसचा पाठलाग करून वराला मंडपापर्यंत घेऊन आली. सजलेल्या वधूने आपले लग्न वाचवण्यासाठी दाखवलेल्या या धाडसाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.