मुंबई: शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.
शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. मनोहर जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भुषविले होते. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले होते. मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. या काळात गजानन किर्तीकर यांच्यासह शिवसेनेतील काही ज्येष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, मनोहर जोशी, लिलाधर डाके यांच्यासारखे बुजूर्ग नेते ठाकरे घराण्याशी निष्ठावान राहिले होते.