• Fri. May 2nd, 2025

हैद्राबाद येथे आयोजित ‘आयटा’ महाराष्ट्राचे दोन दिवसीय शिबीर संपन्न

Byjantaadmin

May 22, 2023

हैद्राबाद येथे आयोजित ‘आयटा’ महाराष्ट्राचे दोन दिवसीय शिबीर संपन्न

हैद्राबाद (इकबाल पाशा): शिक्षकांची राष्ट्रीय नोंदणीकृत संघटना ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन ‘आयटा’ महाराष्ट्र द्वारा आयोजित दोन दिवसीय शिबीर”*है जुस्तजू के ख़ूब से है खूबतर कहां” हैद्राबाद येथे नुकतेच संपन्न झाले.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात फारुख ताहिर (SAC सदस्य आयटा तेलंगणा) तर दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात रियाज़ उल खालिक़ (उपाध्यक्ष आयटा महाराष्ट्र) यांच्या क़ुरआण पठणाने झाली.
अध्यक्षीय भाषणात शेख अब्दुल रहीम (राष्ट्रीय अध्यक्ष आयटा) म्हणाले की, शिक्षकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना आपले आदर्श बनवावे. आपल्या 23 वर्षांच्या आयुष्यात पैगंबर (स.) यांनी सतत प्रयत्न करुन एक आदर्श समाज निर्माण केला. आज आपण पैग़ंबरांचे अनुसरण करून आपली शैक्षणिक जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याची गरज आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून आयटा महाराष्ट्रचे अभिनंदन केले. त्यांनी आयटा च्या कॅडरला नेहमी आत्मपरीक्षण करून आयटाची ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत व संघटनेचा धोरणात्मक कार्यक्रम समोर ठेवून काम करावे आणि आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे आवाहन केले.

सय्यद शरीफ (राज्य अध्यक्ष, आयटा महाराष्ट्र) यांनी शिबिराचे मुख्य विषय
“है जुस्तजू के ख़ूब से है खूबतर कहां ” यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले नाहीत तर त्याच्यात स्तब्धता येते. त्यामुळे शिक्षकांनी त्यांची आपली जबाबदारी पूर्ण करताना नेहमी स्वत:ला अपडेट ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहा. व तसेच शिक्षकांनी स्वतःमध्ये सामाजिक तळमळ आणि त्यागाची भावना निर्माण करण्याची गरज आहे.

‘नेतृत्व कौशल्य का आणि कसे विकसित करावे ?’ या विषयावर मार्गदर्शन करताना हामेद खान (पूर्व राज्य अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, तेलंगणा) म्हणाले की नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी आपली जबाबदारी लक्षात ठेऊन आपल्यात गुणांची वाढ करणे व त्रुटी दूर करणे आहे. ते म्हणाले की नेत्यांमध्ये आत्म-जागरूकता , स्वावलंबन, आत्म-परिक्षण, आत्मविश्वास, शिस्त, निर्णय क्षमता, अंतर्दृष्टी, मानवतावाद, तणाव व्यवस्थापन, निष्पक्षता, आणि कष्टाळू वृत्ती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नेत्यामध्ये ज्ञानाबरोबरच नम्रता, संयम हे गुणही असले पाहिजेत आणि नेता टीका सहन करणाराही असला पाहिजे.

‘हुब्बे तंज़ीम और उसके तक़ाज़े’ या विषयावर मार्गदर्शन करताना एम ए जलील (आयटा महाराष्ट्रचे पूर्व राज्य अध्यक्ष) म्हणाले की, खरा आस्तिक तोच आहे जो अल्लाह आणि त्याचे अंतिम प्रेषित हज़रत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) वर प्रेम करतो. आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन यापण करतो. आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या स्वतःमध्ये जागरुकता निर्माण करणे, शिस्त, त्याग, ध्यास, वचनबद्धता आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी असलम फेरोज़ ( नॅशनल सेक्रेटरी आयटा) आणि आसिया तस्नीम (जमाते इस्लामी हिंदच्या महिला राज्य समन्वयक, तेलंगणा) व तसेच इक्बाल हुसैन (स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष) यांनीही मार्गदर्शन केले.

मुहम्मद अतीक शेख (राज्य सचिव आयटा महाराष्ट्र) आणि रियाज़ उल खालिक़ ( उपाध्यक्ष आयटा महाराष्ट्र ) यांनी पीपीटीद्वारे अहवाल आणि भविष्यातील योजना सादर केली.

यावेळी आयटाच्या मुंब्रा शाखेच्या वतीने तयार करण्यात केलेल्या ‘उर्दू फाउंडेशन कोर्स’ च्या अभ्यासक्रम पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

खलील शाह (अध्यक्ष आयटा मुंबई विभाग), शेख शकील (अध्यक्ष आयटा नांदेड), साबीर शाह (सचिव परभणी) आणि इक्बाल पाशा (मीडिया समन्वयक आयटा महाराष्ट्र) यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी योग्यरीत्या पार पडली.
अशा प्रकारे आयटा महाराष्ट्राचा दोन दिवसीय शिबिर यशस्वीरित्य संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *