राज्य शासनाकडून बांबू लागवडीसाठी सातारा आणि लातूर जिल्ह्यासाठी विशेष उपक्रम
• जिल्हाधिकारी यांनी घेतली पूर्वतयारीसाठी बैठक
लातूर, दि. 22 (जिमाका) : सातारा आणि लातूर या दोन जिल्ह्यात बहुउपयोगी बांबूची लागवड करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठक घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, माजी आमदार पाशा पटेल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सरिता सूत्रावे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कुठे कुठे बांबू लागवड करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी, ग्रामविकास विभाग, कृषि विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने यांनी संयुक्तपणे सर्व्हे करावा. पुढच्या बैठकीत याबाबतचा आढावा घेऊन बांबू लागवडीबाबत योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या कोणकोणत्या शाळांना बांबूचे नैसर्गिक कुंपण करता येईल, याबाबतही जिल्हा परिषदेकडून आढावा घेतला जावा, असेही त्यांनी सांगितले.