*लातूर जिल्ह्यात “शासन आपल्या दारी” ह्या उपक्रमाची औसा येथून 22 मे रोजी भव्य सुरुवात*
*जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणार ” “शासन आपल्या दारी ” कार्यक्रम*
*जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट*
*औसा तालुक्यातील 7 हजारांपेक्षा अधिक लाभार्थीना मिळणार लाभ*
*लातूर दि. 21 (जिमाका)* जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ” शासन आपल्या दारी” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन सोमवार, 22 मे रोजी सकाळी 10 वाजता औसा येथील निलंगा रोडवरील विजय मंगल कार्यालयात होत आहे. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे 60 स्टॉल उभारण्यात येणार असून जवळपास 7 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ येथे दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातील जिल्हास्तरीय अधिकारी यांना निमंत्रित केले असून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार भारत सूर्यवंशी यांनी दिली. तसेच औसा तालुक्यातील अधिकाधिक जनतेनी या अभियानाला भेट द्यावी आणि शासनाच्या योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“शासन आपल्या दारी ” या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग सहभागी होणार असून यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आल्याचेही यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे सांगितले. प्रत्येक तालुक्यात या अभियानाचे आयोजन केले जाणार आहे.
लोक कल्याणाचे ध्येय समोर ठेवून शेवटच्या गरजू पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचावा यासाठी ‘शासन आपल्या दारी ” हे अभियान राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्याचबरोबर या लोककल्याणकारी योजना जनतेला कळाव्यात म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण राज्यात तालुका पातळीपर्यंत “शासन आपल्या दारी ” याचे भव्य नियोजन करण्याचा निर्धार केला आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात हे अभियान राबविण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.