• Sat. May 3rd, 2025

लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये ‘सोनेच सोने’, एसीबीच्या तपासात मिळालं घबाड

Byjantaadmin

May 21, 2023

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत सातत्याने लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या कारवायांचा धडाका सुरु आहे. अशातच मागील आठवड्यात जिल्हा उपनिबंधकस तीस लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी शहरातील संदर्भ रुग्णालयातील (Sandarbh Hospital)  हिवताप विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यास अटक करण्यात आली होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्या हिवताप अधिकाऱ्याची बँक लॉकरची (Bank Locker) तपासणी केली असता घबाड हाती लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी  (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्हा रुग्णालयानंतर (Nashik Civil Hsopital) महत्वाचे असलेले संदर्भ रुग्णालय या निमित्तांने चर्चेत आले आहे. येथील हिवताप विभागात कार्यरत कर्मचाऱ्याकडून दहा हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी संशयित वैशाली दगडू पाटील यांना acb विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. पाटील यांच्या घराची व बँक लॉकरच्या झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता एकूण 81 तोळे सोन्याचे दागदागिण्यांचे घबाड हाती लागल्याने पथकही चक्रावून गेले.

दरम्यान संदर्भ रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या अखत्यारित कार्यान्वित हिवताप विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून वैशाली पाटील या नोकरी करत होत्या. त्यांनी तक्रारदार हे आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्याकरिता त्यांच्याकडे 10 हजारांची लाच सोमवारी मागितली. बुधवारी संशयित आरोग्यसेवक संजय रामू राव, कैलास गंगाधर शिंदे यांच्या मदतीने लाचेची रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकातील हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी शिताफीने सापळा रचला.

बँक लॉकरमध्ये 71 तोळे सोने सापडले

दरम्यान तिघा संशयित लाचखोर लोकसेवकांना पंचांसमक्ष लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले होते. या तिघा संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, पाटील यांच्या बँक लॉकरची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये 71 तोळे व घर- झडतीत 10 तोळे असे एकूण 81 तोळे इतके सोने आढळून आले. पथकाने हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *