• Sat. May 3rd, 2025

जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे : राज्यपाल रमेश बैस 

Byjantaadmin

May 21, 2023

मुंबई, : आज जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने विश्वगुरु व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक संकुलात शनिवारी (दि. २०) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये देशाला मोठ्या प्रमाणात अभियंते, व्यवस्थापक, सीए, कंपनी सचिव, अधिकारी, कुशल कामगार व तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. परंतु त्याहीपेक्षा देशाला चांगले नागरिक घडवणाऱ्या उत्तम शिक्षकांची गरज आहे, असे सांगून मेधावी स्नातक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक बनण्याचा देखील पर्याय निवडावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी विदेशात शिक्षण घेतले परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुन्हा भारतात परत आले, याचे स्मरण देऊन विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेतले तरी देखील देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी परत आले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.  शाळेच्या २०२३ वर्षाच्या ९७ विद्यार्थ्यांना यावेळी शालान्त आयबी डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.       कार्यक्रमाला आमदार मनिषा चौधरी, आमदार पंकज भोयर, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शारोनी मल्लिक, प्राचार्य ग्रॅम कॅसलेक, आयबी प्रमुख अब्सोलोम मुसेवे, स्नातक विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *