राज्य केमिस्टस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी
संघटनेच्या मागण्या मान्य : सचिव अनिल नावंदर
लातूर : राज्यातील केमिस्ट्स बांधवांना होत असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची शुक्रवारी झालेली बैठक यशस्वी झाली असून संघटनेच्या मागण्या शासनाने मान्य केल्याची माहिती संघटनेचे प्रदेश सचिव अनिल नावंदर यांनी दिली.
शुक्रवारी अतिथी गृहावर संपन्न झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, दादा भुसे यांच्यासमवेत राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे,सचिव अनिल नावंदर,विलास जोशी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य सचिव सौरभ विजय आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे राज्यातील केमिस्ट्स बांधवांना नाहक त्रास होणार नाही. तसेच २०१२ ते २०१६ या काळातील केसेस विनाकारण काढल्या जाणार नाहीत, याची ग्वाही दिली. औषधी दुकानाच्या बाहेर अथवा आत डिस्काऊंटचे प्रलोभन देणारे फलक हटविण्याची मागणी संघटनेचे सचिव नावंदर यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. औषध विक्रेत्यांना येणाऱ्या समस्यांचे नियमितपणे निराकरण व्हावे याकरिता २०१३ मध्ये गठीत करण्यात आलेली समिती त्वरित पुनर्गठित करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले आहेत. नित्यनियमाने होत असलेल्या तपासणीमध्ये मेडिकल बरोबर चेन शॉपी, डॉक्टर डिस्पेंसिंग यांचीही तपासणी केली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. बनावट औषधावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाहेरील राज्यातून येणाऱ्या औषधांची माहिती घेऊन नियमितपणे तपासणी करण्याबाबतही या बैठकित चर्चा झाली. संघटनेच्या सर्व अडचणी जाणून घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यात आले. यावेळी हुकुमराज मेहता,सुनील छाजेड, दिलीप देशमुख, नितीन मणियार, निलेश वाणी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.