बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बेड्या ठोकणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याभोवतीच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयनं त्यांच्याविरोधात जी तक्रार दाखल केली त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमनं जी कारवाई केली त्यामध्ये काही नावं जाणीवपूर्वक वगळल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय वानखेडे आणि त्यांच्या टीमनं आर्यन खानसोबत पैशांचे डील केल्याचीही धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये त्यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटींची मागणी केली होती. तर ५० लाख रुपये हे टोकन अमाउंट म्हणून घेतल्याचे समोर आले आहे.
यासगळ्यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी हिची साक्ष यासगळ्या प्रकरणात महत्वाची ठरणार आहे. यात आर्यन खान प्रकरणात वानखेडेंचा तपास, त्यांनी केलेली अटक, त्यामागील कारणे, त्यांच्यावर खंडणीचा दाखल झालेला गुन्हा आणि त्यांनी आर्यन खान प्रकरणात अनेकांशी केलेली बातचीत यावर आता ददलानी काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.सीबीआयनं या प्रकरणाचा तपास सुरु केला असून त्यांनी वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. खंडणी घेतल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला असून आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी वानखेडे आणि त्यांच्या टीमवर चौकशीमध्ये पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आला होता.ज्यावेळी त्या क्रुझवरील पार्टीमध्ये रेड टाकण्यात आली तेव्हा पहिल्या यादीत २७ संशयित आरोपींची नावं होती. त्यानंतर त्या यादीमध्ये केवळ १० ते १५ जणांची नावं होती. हे कसं काय, असा प्रश्न सीबीआयनं विचारला आहे. दुसरीकडे याप्रकरणात शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीची साक्ष महत्वाची ठरणार आहे.