• Sun. May 4th, 2025

३० लाखांचा टीव्ही, ५० विदेशी कुत्रे, महिंद्रा थार अन्…; ३० हजार रुपये पगार असलेल्या महिला इंजिनिअरच्या घरी सापडलं मोठं घबाड…

Byjantaadmin

May 18, 2023

गुरुवारी लोकायुक्तांच्या पथकाने मध्य प्रदेश पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता हेमा मीना यांच्या घरी आणि फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी हेमा मीना यांच्याकडे तब्बल सात कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. मीना यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याची तक्रार लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ही छापेमारी करण्यात आली.

hema meena in bhopal

मीडिया रिपोर्टनुसार, मीना यांच्याकडे आतापर्यंत सात कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. यामध्ये ३० लाखांचा टीव्ही, दागिने, विविध प्रजातींचे ५० विदेशी कुत्रे, गाई, म्हशी, दोन ट्रक, एक थारसह १० आलिशान वाहने आणि रोकड यांचा समावेश आहे. याबरोबरच मीना यांच्या फार्महाऊसवर एक स्पेशल रुम बनवण्यात आली होती. या रुमध्ये मोठ्या प्रमाणात महागडी दारू आणि सिगारेट, हार्वेस्टर, भात पेरणी यंत्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणंही आढळून आली आहेत.

संपर्कासाठी वॉकी टॉकीचा वापर

हेमा मीना या त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या २० हजार चौरस फुट जागेवरील बंगल्यात राहतात. या बंगल्यात ४० खोल्या आहेत. तसेच शेकडो कामगार आहेत. या आलिशान बंगल्यात एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी त्या वॉकी टॉकीचा वापर करत असत. वॉकी टॉकीवरुनच मीना त्यांच्याशी संवाद साधत असतं.

मीना यांना ३० हजार रुपये मासिक वेतन

दरम्यान, हेमा मीना यांचे मासिक वेतन ३० हजार रुपये असून त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा २३२ टक्क्यांनी जास्त आहेत, अशी माहिती लोकायुक्त पथकातील डीएसपी संजय शुक्ला यांनी दिली. तसेच हेमा मीना यांना ताब्यात घेण्यात आलं असून यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *