मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नागरिकांना उन्हाची झळ बसू लागली आहे. राज्यातील ठाणे, जळगाव, नागपूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या जवळपास आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा दिला. या कालावधीत नागिरकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून कलाम तापमान ४० पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस या तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये बुधवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अमरावती आणि वर्ध्यात (४२.४ अंश सेल्सिअस) सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.
सध्या तापमानात चांगली वाढ झाली आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडताना नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी तोंडाला स्कार्प, रुमाल बांधावे. टोपीचा वापर करावा. पाणी शुद्ध व जास्त प्रमाणात प्यावे. जेवण करताना ताक, दही याचा समावेश असावा. शरबत सारखे शितपेय प्यावे. उन्हामुळे त्रास जाणवू लागला तर रुग्णालयाशी संपर्क साधावा.