मोदी मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी मंत्रिमंडळातील या बदलालामंजुरी दिल्याचं वृत्त आहे. अधिकृत माहितीनुसार, किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या बदलाबाबत एबीपीशी खास बातचीत करताना किरेन रिजिजू म्हणाले की, “आगामी निवडणुका लक्षात घेऊन खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात जन्मलेले किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत.”
केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रालयाच्या कामांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतरच सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर मंत्रालयांबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
पंतप्रधान मोदींकडून मिळाले होते बदलाचे संकेत
लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर फेरबदल करु शकतात अशी अटकळ २०२३ वर्षाच्या सुरुवातीपासूनच बांधली जात होती. सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जात होतं की, पंतप्रधान मोदींनी बदल करण्याची वेळ आली आहे, असे संके दिले होती. सोबतच वाईट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना हटवण्यासोबतच राज्यांमध्ये स्टार प्रचारक ठरलेल्या खासदारांना मंत्रिमंडळात जागा मिळू शकते.
अर्जुन राम मेघवाल लवकरच पंतप्रधान मोदींसह एकाच व्यासपीठावर
तर, राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना विद्यमान खात्यांव्यतिरिक्त किरेन रिजिजू यांच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रगती मैदानावर लवकरच होणाऱ्या सरकारी कार्यक्रमात अर्जुन राम मेघवाल हे पंतप्रधान मोदींसोबत मंचावर उपस्थित राहणार असल्याचं कळतं
Kiren Rijiju :
Not Law
Now Minister for Earth SciencesNot easy to understand the science behind the Laws
Now will try to grapple with the laws of science
Good luck my friend !
— Kapil Sibal (@KapilSibal) May 18, 2023
कपिल सिब्बल यांच्याकडून खिल्ली
ज्येष्ठ वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी या फेरबदलाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “कायदा नव्हे, आता पृथ्वी विज्ञान मंत्री. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणं सोपं नाही. आता विज्ञानाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागतील. शुभेच्छा मित्रा.”