• Mon. May 5th, 2025

मोठा मासा एसीबीच्या गळाला; तब्बल ३० लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

Byjantaadmin

May 16, 2023

नाशिक : प्रलंबित कामे आणि नागरिकांना सतत पाठपुरावा करण्यासाठी भंडावून सोडणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोमवारी (ता. १५) सायंकाळी लाचखोरीचा प्रकार उघड झाला. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना तीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)च्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या एका वकिलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

acb nashik

काय आहे प्रकरण?

एका बाजार समिती प्रकरणात दाखल तक्रार अर्जावर सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासह सहकार्य करण्यासाठी खरे यांनी तीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हे नाशिक जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांच्या प्रकरणाची सुनावणी आज, मंगळवारी उपनिबंधक कार्यालयात होणार होती. परंतु, त्या आधीच तक्रारदारांनी ‘एसीबी’शी संपर्क साधल्याने सापळा रचण्यात आला होता. आई हाईटस, कॉलेजरोड येथील घरी लाखो रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना सतीश खरे यांना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी एसीबी कार्यालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह चौकशी व अटकेची कारवाई सुरू होती. ‘एसीबी’चे एक पथक खरे यांच्या मालमत्तेसह घरझडतीसाठी रवाना झाले होते.

शैलेश सुमतीलाल सभद्रा या वकिलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. वादग्रस्त कारकिर्द राहिलेल्या खरे यांनी जिल्हा बँकेत प्रशासक म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच तालुका उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक म्हणूनही ते कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *