• Mon. May 5th, 2025

एक हनी अन् दोन ट्रॅप! आधी हाय हॅलो अन् नंतर…

Byjantaadmin

May 16, 2023

डीआरडीओचे संचालक   आणि भारतीय वायुदलात तैनात असलेले निखिल शेंडे या दोघांना फसवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून दोन मध्यमवयीन वयाच्या महिलांचे फोटो वापरण्यात आले आहेत. कुरुलकरांशी संपर्क साधणाऱ्या झारा दासगुप्तांने तिचं वय 35 असल्याचं आणि ती लंडनमध्ये राहत असल्याचं सांगितलं तर निखिल शेंडेंशी संपर्क केलेल्या महिलेनेही ती लंडनमध्ये राहत असल्याचं सांगितलं . मात्र या दोघींकडून संपर्क साधण्यासाठी पाकिस्तानमधील एकच इंटरनेट वापरलं जात असल्यानं या घटनेचा भांडाफोड झाला. प्रदीप कुरुलकरांना मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं तर निखिल शेंडेंची चौकशी करणार असल्याचं एटीएसने न्यायालयात सांगितलं आहे.

आधी हाय हॅलो अन् नंतर खासगी चॅटींग…

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर अनेकांना अनेकदा अनोळखी महिलांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येतात. मध्यमवयीन आणि मादक दिसणाऱ्या या महिलांकडून हाय – हॅलोने संवादाला सुरुवात होते आणि पुढं पर्सनल चॅटिंग सुरु होतं. हळूहळू रोजच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी एकमेकांना सांगण्यास सुरुवात होते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या घडामोडीदेखील एकमेकांसोबत शेअर केल्या जाऊ लागतात. दोन्ही बाजूंनी संवादात हा मोकळेपणा आला असल्यानं यातील पुरुषाला जरा देखील संशय येत नाही. पण इथंच तो पुरुष हनी ट्रॅपच्या जाळयात अडकायला सुरुवात झालेली असते.

प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडेंना जाळ्यात  अडकवण्यासाठी हिच पद्धत वापरण्यात आली. कुरुलकर आणि शेंडे हे दोघेही कित्येक महिने आपण एका महिलेशी संवाद साधतोय या भ्रमात त्यांच्याकडील सर्व माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देत होते. सायबर एक्स्पर्टच्या मते अशा संवादांमध्ये समोरच्या व्यक्तीनं पाठवलेल्या कोणत्याही लिंकला जर क्लिक करून ओपन करण्यात आलं तर आपल्या मोबाईलचा पूर्ण एक्सेस समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. कुरुलकरांच्या बाबतीत हीच भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षी ऑक्टोंबरमध्ये प्रदीप कुरुलकरांशी झारा दास गुप्तां या नावाच्या महिलेने संपर्क केला. आपण लंडनमध्ये राहत असून क्षेपणास्त्र क्षेत्रात संशोधन करत आहोत, असं तिनं कुरुलकर यांना सांगितलं. 35 वर्षांच्या झारा दासगुप्तांने 63 वर्षांच्या कुरुलकरांना भुरळ पाडायला सुरुवात केली. आपल्याला संशोधनासाठी तुमची मदत हवी आहे, असं सांगणाऱ्या झारा दास गुप्तांने हळहळू कुरुलकरांना तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगायला सुरुवात केली. मग कुरुलकर देखील आणखी मोकळेपणाने तिच्याशी बोलू लागले.

दोघांनीही शेअर केली खासगी माहिती अन् फोटो…

झारा दासगुप्तांने तिचे वेगवगेळे फोटो पाठवायला सुरुवात केली. अनेकदा हे फोटो अर्धनग्न अवस्थेतील असायचे.  इकडून कुरुलकरही त्यांचे वेगवगेळे फोटो पाठवत होते. या दोघांमध्ये दरररोज प्रचंड प्रमाणात चॅटिंग होत होतं. पाकिस्तानमधील आय पी अॅड्रेसवरून एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या चॅटिंगमुळे भारताच्या आयबीला संशय आला आणि आयबीने तपास सुरु केला. फेब्रुवारी महिन्यात ही झारा दासगुप्ता म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असल्याचं भारतीय गुप्तचर विभागाला लक्षात आलं. त्यानंतर त्याची माहिती डीआरडीओला देण्यात आली. प्रदीप कुरुलकरांना याची माहिती समजताच त्यांनी झारा दासगुप्तांचा नंबर ब्लॉक केला. मात्र काही दिवसांनी या झारा दासगुप्तांने दुसऱ्या मोबाईल नंबरवरून “व्हाय आर यू ब्लॉक्ड मी’ म्हणजे तू माझा नंबर ब्लॉक का केला अशी विचारणा करणारा मेसेज दुसऱ्या एका नंबरवरून आला.

निखिल शेंडेही अडकले जाळ्य़ात…

maharshtra एटीएसने जेव्हा याचा तपास सुरु केला तेव्हा प्रदीप कुरुलकरांना तुम्ही माझा नंबर ब्लॉक का केला अशी विचारणा करणारा मेसेज झारा दास गुप्तांने ज्या दुसऱ्या नंबरवरून केला होता त्या नंबरचा माग काढायला सुरुवात केली. तेव्हा या दुसऱ्या नंबरवरून भारतीय वायुदलातील निखिल शेंडेंशी मागील काही महिन्यांपासून सतत चॅटिंग होत असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर एटीएसने निखिल शेंडेंची चौकशी करायचं ठरवलं. 14 दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्याने प्रदीप कुरुलकरांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. मात्र कुरुलकरांनी कोणती संवेशनशील माहिती पाकिस्तानला दिलीय आणि डी आर डी ओ च्या गेस्ट हाऊसमध्ये ते कोणत्या महिलांना भेटत होते याचा एटीएसकडून शोध घेतला जातोय. तर दुसरीकडे निखिल शेंडेंने भारतीय वायुदलाची कोणती माहिती पाकिस्तानला दिलीय का?याचाही शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *