मुंबई: कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने समीर वानखेडे यांची पाळेमुळे खणून काढायला सुरुवात केली आहे. समीर वानखेडे हे सध्या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. एनसीबीने केलेल्या विशेष चौकशीच्या आधारावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीच्या अहवालात समीर वानखेडे यांनी अयोग्य आणि अप्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याचे म्हटले आहे. कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणात वानखेडे यांनी संशयितांकडून बेकायदेशीर लाभ उकळण्याचा प्रयत्न केला, असेही अहवालात म्हटले आहे
समीर वानखेडे यांनी मुंबईतील एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची कारकीर्द प्रचंड गाजली होती. वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई एनसीबीने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींवर कारवाई केली होती, त्यांची चौकशी केली होती. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे समीर वानखेडे लाईमलाईटमध्ये आले होते. तेव्हा समीर वानखेडे यांच्या हातातील घड्याळे आणि इतर उंची वस्तूंची चर्चा रंगली होती. वानखेडे यांनी विभागाला न कळवता या खासगी संस्थेबरोबर महागडय़ा मनगटी घडय़ाळांची विक्री आणि खरेदी केल्याचेही चौकशी अहवालात म्हटले आहे. याशिवाय, समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे परदेश दौरेही चर्चेचा विषय ठरले होते. चौकशीदरम्यान समीर वानखेडे यांना या परदेश दौऱ्यांच्या खर्चाविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आलेले नाही.
समीर वानखेडेंचे उत्पन्न-मालमत्ताचा ताळमेळ नाही
समीर वानखेडे यांच्या उत्पन्न आणि मालमत्तेचा ताळमेळ बसत नसल्याची बाबही चौकशीदरम्यान पुढे आली आहे. वानखेडे हे विरल रंजन नावाच्या एका व्यक्तीसोबत महागड्या घड्याळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होते. याची कोणतीही माहिती वानखेडे यांनी दिली नव्हती. वानखेडे यांनी परदेशी प्रवासाच्या खर्चाचा तपशीलही चुकीच्या पद्धतीने सादर केला आहे.
समीर वानखेडेंनी मागितले २५ कोटी, १८ कोटींमध्ये सौदा ठरला
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे की, समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरुन किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे २५ कोटींची मागणी केली आणि तडजोडीनंतर १८ कोटी रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. त्यापैकी ५० लाख रुपये के.पी. गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले होते. मात्र, ते ५० लाख रुपये नंतर त्यांनी परत केल्याची माहितीही समोर आले आहे.