मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील छाप्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितली; तसेच ५० लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘एनसीबी’च्या दक्षता समितीने याबाबत केलेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यानंतर सीबीआयकडे तक्रार केली होती. सीबीआयने या प्रकरणात वानखेडे, एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात सीबीआयच्या पथकांनी वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानासह देशभरात २९ ठिकाणी शुक्रवारी छापे टाकले होते. यामध्ये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. दरम्यान, सीबीआयने समीर वानखेडे यांचा फोन जप्त केला आहे. त्यांच्या मोबाइलमधील डाटा मिळवण्यासाठी एक विशेष टीम नेमण्यात आली आहे.
हिशेबी मालमत्तेप्रकरणी कारवाईच्या शक्यतेने समीर वानखेडे यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोणतीही मालमत्ता पूर्वसूचना दिल्याशिवाय जप्त करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र त्यावेळेस कारवाई सुरू असल्याबाबत कोणतीही कागदपत्रे सादर न करता केवळ तोंडी मागणी केल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती.
कसा रचला कट, काय काय म्हटलं सीबीआयने?
सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडे आणि इतर जणांनी हा कट कसा रचला याबद्दलची माहिती सीबीआयच्या FIR मध्ये नमूद करण्यात आली आहे. आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून आरोपी आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा के. पी. गोसावीला देण्यात आला होता. आणि वानखेडे यांच्या आदेशानुसारच के. पी. गोसावी हा आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता, असं सीबीआयने FIR मध्ये म्हटलं आहे.