मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणामुळे चर्चेत होता. आता पुन्हा एकदा या प्रकरणाने डोकं वर काढलं असून, यामध्ये तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचं नाव चर्चेत आलं आहे. समीर वानखेडेंवर असा आरोप करण्यात आला की, शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरणात अडकू नये आणि कारवाई टाळता यावी म्हणून त्यांनी आणि इतर काही अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितली. तसेच ५० लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप ठेवण्यात आला. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. आता याबाबत त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडेची प्रतिक्रिया समोर आली आहे. समीर वानखेडेंवर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सर्वांना माहितेय, अशी प्रतिक्रिया क्रांतीने दिली.
‘प्रत्येकाला माहीत आहे की त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत’, अशी प्रतिक्रिया क्रांतीने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
"Everyone knows allegations against Sameer Wankhede are wrong," says former NCB officer's wife on Aryan Khan bribery case
Read @ANI Story | https://t.co/qcKyW04tbd#SameerWankhede #AryanKhancase #NCB pic.twitter.com/hZlmaWXQyn
— ANI Digital (@ani_digital) May 15, 2023
शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एनसीबीचे तत्कालिन अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य तिघांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर वानखेडेंचीही प्रतिक्रिया समोर आलेली. त्यांनी असे म्हटले की, त्यांना देशभक्त असल्याची शिक्षा होतेय. वानखेडे यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर शुक्रवारी सीबीआयने छापे टाकले. त्यानंतर वानखेडेंचे हे वक्तव्य समोर आले होते. समीर यांचा आरोप आहे की, सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या घरी छापा टाकला, त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुली घरातच होत्या.