• Tue. May 6th, 2025

हज यात्रेकरुंकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात सवलत द्या-अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Byjantaadmin

May 15, 2023

हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकरुंकडून हज कमिटीने प्रवासासाठी निर्धारित शुल्कावर नागपूर अथवा मुंबई विमानतळ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. असं असलं तरी नागपूर विमानतळाचा पर्याय स्वीकारणाऱ्या हज यात्रेकरूंकडून ६३ हजार रुपये इतकं अतिरिक्त शुल्क आकारलं जात आहे. त्यामुळे हज यात्रेकरुंवर अतिरिक्त शुल्काचा बोजा पडत आहे, तरी या अतिरिक्त शुल्कावर सवलत देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या पत्रात अजित पवार यांनी नमूद केलं आहे की, हज ही मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक यात्रा असून या हज यात्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून जात असतात. सरकारकडून हज यात्रेकरूंना विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंना अर्ज भरताना हज कमिटीने प्रवासासाठी निर्धारित शुल्कावर नागपूर आणि मुंबई विमानतळ हे दोन पर्याय दिले होते. त्यानुसार हजारो यात्रेकरूंनी अर्जात मुंबई किंवा नागपूर या दोनपैकी त्यांना अनुकूल असा पर्याय निवडला होता.

विरोधी पक्षनेते AJIT PAWAR यांनी म्हटलं आहे की, दरम्यान, हज कमिटीकडून काही यात्रेकरूंना MUMBAI तर काहींना NAGPUR विमानतळाचा पर्याय देण्यात आला. परंतु, नागपूर विमानतळाचा पर्याय दिलेल्या यात्रेकरुंकडून ६३ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. मुंबईपेक्षा नागपूर विमानतळ मिळालेल्या यात्रेकरूंना प्रवास शुल्कात ६३ हजार रुपये एवढी मोठी वाढ झाल्याने त्यांच्यापुढे अतिरिक्त रक्कम उभी करण्याची अडचण निर्माण झाली आहे. अनेक यात्रेकरूंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अतिरिक्त ६३ हजार रुपये उभे करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून नागपूर विमानतळाऐवजी त्यांना मुंबई विमानतळ देण्यात यावे किंवा ते शक्य नसेल तर अतिरिक्त शुल्कात सवलत द्वावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *