• Tue. May 6th, 2025

2023: कर्नाटकच्या विजयानं 2024 साठी मोदींना धक्का बसेल का? काय सांगतात आकडे?

Byjantaadmin

May 15, 2023
New Delhi: Prime Minister Narendra Modi during Central Election Committee meeting at BJP HQ in New Delhi, Tuesday, March 10, 2020. BJP National President JP Nadda is also seen. (PTI Photo/Manvender Vashist)(PTI10-03-2020_000135B)

(Karnataka Election Result 2023) (Congress) मुसंडी मारत भाजपला मोठा धक्का दिला आहे. कर्नाटकची निवडणुकीकडे 2024 लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होतं. अशातच काँग्रेसच्या एकहाती विजयामुळे 2024 मध्येही भाजपला शह देण्यात विरोधकांची एकजूट यशस्वी होणार असल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटकच्या विजयाचा 2024 ला काय परिणाम होणार? विधानसभा तर गेली, पण लोकसभेतही भाजपला फटका बसणार का…? आकडे काय सांगतात, इतिहास काय सांगतो…? कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर सध्या या प्रश्नांची चर्चा सुरु आहे. कुठलाही विजय हा दिलासादायकच असतो. या विजयानं काँग्रेसला लोकसभेसाठी रसद पुरवणारं राज्य दिलंय, सोबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिलाय आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठाही वाढवली आहे. पण जी किमया विधानसभेत घडली ती लोकसभेतही आपोआप दिसेल या भरवश्यावर मात्र काँग्रेसला राहून चालणार नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीही मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगढ ही तीन राज्यं काँग्रेसनं जिंकली होती. त्यावेळी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र या तीन राज्यांतल्या 65 पैकी 62 लोकसभा जागा भाजपनं जिंकल्या होत्या. म्हणजे राज्यं काँग्रेसकडे पण लोकसभा मोदींकडे असा कौल अवघ्या काही महिनाभरात जनतेनं दिला होता

कर्नाटकमध्ये लोकसभेचं गणित काय सांगतं?

  • कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत.
  • मागच्या वेळी 28 पैकी 26 जागा भाजपनं जिंकल्या होत्या
  • काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.
  • आता काँग्रेसनं थोडी जरी कामगिरी सुधारली तरी भाजपच्या टॅलीत घट ठरलेली आहेच, पण ते करणं इतकं सोपंही नसेल

गेल्या चार लोकसभा निवडणुकीतली काय स्थिती? 

  • 2004 : भाजप 18, काँग्रेस 8, जेडीएस 2
  • 2009 : भाजप 19, काँग्रेस 6, जेडीएस 3
  • 2014 : भाजप 17, काँग्रेस 9, जेडीएस 2
  • 2019 : भाजप 25, काँग्रेस 1, जेडीएस 1

त्यामुळे भाजप गेल्या चार लोकसभा निवडणुकीत 17 च्या वरच राहिलेली आहे. त्यातही 2004, 09 ला तर मोदी फॅक्टर नसतानाही. त्यामुळे आता 2024 ला भाजपच्या टॅलीत किती घट काँग्रेस करु शकतं हे पाहणं महत्वाचं असेल.

कर्नाटकमध्ये बोम्मई सरकारविरोधात अँन्टी इन्कम्बन्सीची भावना होती. तशी केंद्रात मोदी सरकारविरोधात अजून आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. सोबत कर्नाटकामध्ये 40 टक्के कमिशन सरकारची चर्चा झाली. केंद्रात अदानींसारख्या उद्योगपतींवर मेहेरबान असल्याची चर्चा होऊनही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराची इमेज ठसवण्यात विरोधक अपयशी ठरलेत. कर्नाटकात भाजपकडे चेहरा नव्हता, तर काँग्रेसकडे स्थानिक पातळीवर दोन तगडे पर्याय होते. तसेच पर्याय केंद्रात मात्र अजून उभे राहताना दिसत नाहीयत. हे सगळे मुद्दे 2024 च्या निवडणुकीत महत्वाचे ठरतील.

अर्थात कर्नाटकच्या निकालानं आपली लोकशाहीची ताकदही दाखवून दिली आहे. जनतेला गृहीत धरु नका, नाहीतर जनता तुम्हाला जागा दाखवते. विरोधकांना स्पेस मिळत राहणं हेही सुदृढ लोकशाहीसाठी चांगलंच लक्षण असतं. फक्त जो कौल विधानसभेत तोच लोकसभेत दिसेल असा निष्कर्ष मात्र घाईचा ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *