मुंबई: विमान प्रवाशाच्या पोटात सोने आढळल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. या व्यक्तीने प्लास्टिकमध्ये सोन्याचे तुकडे गुंडाळले होते. दुबईहून मुंबईला जाताना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीसाठी बोलवले असता त्यांना बघून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. अधिकाऱ्यांना बघताच त्याने एकूण सात तुकडे गिळले. अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ताब्यात घेत त्याला स्थानिक रुग्णालयात नेले असता एक्स-रेमध्ये पोटात सोने आढळले. डॉक्टरांनी कौशल्याने २४० ग्रॅम सोने त्याच्या पोटातून बाहेर काढले. पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर गुरुवारी सोन्याची तस्करी करत असल्याचा संशय असलेल्या ३० वर्षीय तरुणाला पकडण्यात आले. हा तरुण दुबईवरून मुंबईला आला होता. विमानातून उतरल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला हटकले. त्यांना पाहून या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षारक्षकांनी वेळीच त्याला पकडले. यानंतर या तरुणाला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्याच्या पोटातून सोन्याची बिस्कीटे असल्याची बाब समोर आली. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता तरुणाने झाल्या प्रकाराबद्दल कबुली दिली. या तरुणाने दुबईहून सोन्याची बिस्कीटे आणली होती. परंतु, सोन्यावरील सीमाशुल्क वाचवण्यासाठी आपण सोन्याची ही बिस्कीटं गिळल्याचे त्याने सांगितले. या तरुणावर सीमाशुल्क कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.