• Mon. May 5th, 2025

राज्यातून मुली-महिला बेपत्ता! आंतरराष्ट्रीय कट असल्याची शंका; चाकणकर म्हणाल्या…

Byjantaadmin

May 14, 2023

देशात ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपाटवरुन वातावरण तापलेलं असतांनाच काही दिवसांपूर्वी मार्च महिन्यामध्ये राज्यातील २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. तसेच मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झालेल्या आहेत. दरम्यान हे मुली व महिलांचे बेपत्ता होण्याचं प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांनी आज, १४ मे रोजी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “या महाराष्ट्र राज्यातून १६ ते ३५ वयाच्या मुली महिला बेपत्ता होत असल्याचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ह्यामध्ये मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.”

“मोठ्या प्रमाणात मुली महिला बेपत्ता होत असल्याने प्रशासन व पोलिसांनी केलेली कारवाई आणि उपाय योजना यासंबंधी उद्या दि. १५ मे रोजी दुपारी ३.०० वाजता आयोगासमक्ष सुनावणी होणार आहे. सदर सुनावणी करिता अपर मुख्य सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य व पोलीस उपायुक्त (प्रतिबंध), हरवलेल्या व्यक्ती विभाग यांना उपस्थित राहून अहवाल आणि उपाययोजना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” असेही चाकणकर म्हणाल्या आहेत.

समोर आली धक्कादायक आकडेवारी

काही दिवसांपूर्वी महिला अयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत राज्यातून मार्च महिन्यात २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्याचं सांगून गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली होती.

तसेच मार्च महिन्यामध्ये सरासरी दररोज ७० मुली गायब झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. तसेच बेपत्ता होणाऱ्या मुलींचं वय १८ ते २५ वयोगटातील असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये राज्यातील ५ हजार ६१० तरुणी गायब झाल्या आहेत. मुलींचं बेपत्ता होण्याची कारणं लग्न, नोकरी, प्रेमाचं आमिष अशी सांगितली जात आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात १८१० मुली बेपत्ता झालेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *