महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला बैठक नुकतीच झाली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित होते. बैठकीनंतर मविआतर्फे संजय राऊत, नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी एकत्रित पत्रकार परिषद झाली. यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच भाजपला धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी मविआने सुरू केल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात मविआचाच विजय होणार
संजय राऊत म्हणाले, माध्यमांत मविआबद्दल जे दाखवले जात आहे, तसे काही नाही. कर्नाटकात काँग्रेस नाही तर विरोधी पक्ष जिंकला आहे. मविआ सरकार पाडले ते कसे चुकीचे आहे हे आम्ही जनतेला सांगणार आहोत. हे सरकार बेकायदेशीर आहे, जनतेला आम्ही सर्वजण हेच समजून सांगणार आहोत. मविआचा महाराष्ट्रात विजय होणार आहे.
..तरीही ते हसतात
संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने आहे हे समजून घ्या. हे सरकार गैर आहे. एवढे ताशेरे ओढूनही सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हसतात मी यावर जास्त बोलणार नाही. आम्ही कर्नाटकसारखा विजय मिळवून दाखवू. शिवसेनेची येत्या काळात चर्चा होणार. आमच्यात कोणतेही मतभेद नाही. कुणालाही आमच्या नात्याबंद्दल काळजी करण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असाहय
संजय राऊत म्हणाले, आम्ही मजबूत लोक आहोत. असाहय लोक दोन आहेत त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीकडे असाहतेने बघतात असे लोक आम्ही पाहीले नाहीत. उन्हाळा संपताच वज्रमूठ सभा घेऊ.
निवडणुका आणि कोर्टाच्या निर्णयावर चर्चा
जयंत पाटील म्हणाले, आजच्या बैठकीत निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. मविआ म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालावर साधक बाधक चर्चा बैठकीवर झाली. पुढे कोणत्या गोष्टी होण्याची शक्यता आहे याची चर्चा झाली. अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने जबाबदारी दिली याचाही आढावा घेतल्या आहेत. उन्हाळ्यामुळे मविआच्या बैठका पुढे ढकलल्या. जूनचा पाऊस पाहता आम्ही या बैठका सुरू करणार आहोत. मविआच्या सभाही पाऊस आणि ऊन पाहुन थांबवल्या त्या पुन्हा आम्ही अंदाज घेवून सुरू करू.
कर्नाटकचे यश डोळ्यासमोर ठेवणार
जयंत पाटील म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपांबद्दल मविआचे घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष यांना बोलावून चर्चा करणार आहोत. मविआला सक्षम करण्याचे प्रयत्न होत आहे. यावरच आमच्या सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. कर्नाटकसारखेच यश मिळवण्यासाठी मविआ राज्यात प्रयत्न करणार आहे.
आम्हाला मोठा आनंद
जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकातील यश काॅंग्रेससाठी मोठे आहे. भाजप पराभूत झाला त्यामुळे आम्हालाही बळ मिळाले आणि आनंद झाला आहे. तेथील निकालाचा आम्ही आढावा आजच्या बैठकीत घेतला आहे.
भाजपचे पानीपत कसे होईल यावर चर्चा
नाना पटोले म्हणाले, कर्नाटकातील जनतेच्या मनात भाजप, अमित शहा आणि मोदींच्या विरोधात राग होता त्यातून हा निकाल आला आहे. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकचे सरकारमधील नेते भ्रष्टाचारी आहेत. हे जनतेनेही ओळखले आहे. येत्या काळात महाराष्ट्रातून भाजपचे असंवैधानिक सरकारचे पानीपत कसे करता येईल यासह विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात यावर चर्चा झाली.
भाजप सरकार असंवैधानिक
नाना पटोले म्हणाले, शिंदे – भाजप सरकार असंवैधानिक आहे. ज्यांनी सुरक्षा मागितली त्यांनाच राज्यात मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांनी केले. याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार. वज्रमूठ सभा तसेच कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची योजना आहे.
भाजप सरकार कसे पाडले हे सांगू
नाना पटोले म्हणाले, कर्नाटकातील सरकार कसे पाडले व जनतेच्या मनात भाजपबद्दल कसा राग निर्माण झाला हे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहोत. भाजपला सर्व एकत्रितरित्या हद्दपार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नाराजी आमच्यात कुठेच नाही. आम्ही एकत्रित आहोत आणि एकत्रच राहणार. भाजप मुळ मुद्द्याला बगल देत आमच्यातच वाद असल्याचे वातावरण निर्माण करत आहे.
यावर होणार चर्चा
आज होणाऱ्या बैठकीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसने अभुतपूर्व विजय मिळवला. काँग्रेसच्या या विजयाने विरोधकांच्या आशा आणखीनच पल्लवीत झाल्या आहेत. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये जागा वाटपांबद्दल प्राथमिक चर्चा झाली.