मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच पक्षाच्या आमदार आणि नेत्यांशी शनिवारी संवाद साधला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरही चर्चा करण्यात आली
सत्तासंघर्षाचा निकाल आपल्या बाजूने लागला असून तो आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी नेतेमंडळी आणि आमदारांना केली. तर, कर्नाटकमध्ये भाजपला घालवले असून आता महाराष्ट्रातून घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व आमदारांना समजावून सांगण्यात आला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे स्पष्ट करण्यात आले.‘आता हा निकाल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांना समजावून सांगितले पाहिजे. म्हणजे लोकांचा या निकालावरील विश्वास वाढेल’, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितले. तसेच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.