नांदेड : दिवसभर उन्हात शेतातील कामे आटोपून घरी परतलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा उष्मघात आणि त्यानंतर हृदय विकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. विशाल रामराव मादसवार असं या तरुणाचं असून तो हिमायतनगर शहरातील रहिवासी आहे. उष्मघाताने बळी गेल्याने हिमायतनगर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सद्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. दररोज तापमाणात वाढ होतं आहे. अशा उन्हातच शुक्रवारी विशाल मादसवार हा शेताकडे गेला होता. भर उन्हात त्याने शेतीची कामे केली. दिवसभर शेतीची कामे आटोपून तो सायंकाळी ६ वाजे च्या सुमारास घरी परतला. उन्हात काम केल्याने त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्याने ही गोष्ट घरच्यांना न सांगता तो झोपी गेला. शनिवारी सकाळी त्याची तब्येत आणखी बिघडली.
नांदेडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी
उलटी झाल्याने कुटुंबीयांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र नियतीने घात केला आणि ह्रदयविकाराचा हलका झटका आल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात उष्मघाताने हा पहिला बळी गेला आहे.
जिल्ह्यात या वर्षीचा सर्वाधिक तापमानाची नोंद
अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणानंतर आता पुन्हा उन्हाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी नांदेडमध्ये कमाल तापमान हे ४३. २ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलंय. या वर्षीचे हे सर्वाधिक तापमान आहे. या वाढलेल्या उष्णतेमुळे नांदेडमध्ये दिवसा रस्ते निर्मनुष्य बनले आहेत.