• Sun. May 4th, 2025

त्रिशंकूच्या शक्यतेने कर्नाटकात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेस-भाजपचा जदच्या आमदारांवर डोळा

Byjantaadmin

May 12, 2023

बंगळूर : मतदानानंतर आलेल्या सर्वेक्षणावरून कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा उद्या (ता. १३ मे) निकाल जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप आणि काँग्रेसकडून पडद्यामागे राजकीय डावेपच आखले जात आहेत. धजद किंगमेकर ठरण्याची शक्यता असून त्यांच्या आमदारांवरच भाजप आणि काँग्रेसचा डोळा असणार आहे.

मतदानोत्तर सर्व्हेक्षणात कर्नाटकात त्रिशंकू परिस्थितीचे संकेत आल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसकडून सरकार स्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला बहुमताला काही जागा कमी पडल्या तर आम्ही काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सूचक विधान एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.दुसरीकडे, काँग्रेसकडून सरकार स्थापनेसाठी पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘काँग्रेस आता कर्नाटकची जुनी काँग्रेस राहिलेली नाही. आता आम्ही आणखी विकसित झालो आहोत. आमच्या आमदारांची ‘शिकार’ करणे शक्य नाही.

काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे सतत एकमेकाच्या संपर्कात आहेत. माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत नेते जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचा उत्साह दुणावला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि धजदचे नेते कुमारस्वामी म्हणाले की, आम्ही आमच्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू आणि मीच कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री बनणार आहे. आमच्या पक्षात अंतर्गत समस्या नसत्या तर आम्ही एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, असेही धजद नेत्यांना वाटते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर घेण्यात आलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये बहुतांश सर्व संस्थांनी काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरेल असे म्हटलेले आहे. काँग्रेसला बहुमतासाठी काही जागा कमी पडू शकतात, त्यामुळे काँग्रेसच्या गटात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. बहुमतासाठी जागा कमी पडल्या तर काय करायचं, याचा विचार काँग्रेस नेते करताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन तास राजकीय चर्चा झाली.

भाजपला बहुमत मिळणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, आम्ही स्वबळावर कर्नाटकमध्ये पुन्हा सरकार बनवू. पूर्ण बहुमत मिळण्याचा भाजपला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा, सोशल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या कामगिरीच्या जोरावर डब्बल इंजिनचे सरकार पुन्हा कर्नाटकात सत्तेवर येईल. धर्मनिरपेक्ष जनता दल किंगमेकर होणार नाही. विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवून आम्हीच किंग बनू.

डब्बल इंजिन कर्नाटकात निकामी झाले : शिवकुमार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, आम्ही १४६ पेक्षा जास्त जागा जिंकणार असून एक्झिट पोलच्या अंदाजांवर आमचा कोणताही विश्वास नाही. कर्नाटकची जनता जागृत आणि डोळस आहे. कर्नाटकाचे हित बघूनच लोकांनी मतदान केले आहे. डब्बल इंजिन कर्नाटकात निकामी झाले आहे, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *