मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते (Vishwanath Mahadeshwar) यांचं निधन झालं आहे. त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. त्यांनंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.
महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचं मोठं नुकसान
विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह इतर शिवसैनिक उपस्थित राहतील. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वीच ते कणकवली गावाहून मुंबईला पोहोचले होते.
महाडेश्वर 2017 ते 2019 काळात मुंबईचे महापौर होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मतदार संघ आहे