मौलाना जमील इलियासींच्या मजारवर फुलेही वाहिली. कोणत्याही मुस्लिम धार्मिक संघटनेच्या प्रमुखांशी सरसंघचालकांची मशिदीत झालेली ही पहिलीच भेट आहे. यानंतर भागवत यांनी उत्तर दिल्लीतील मदरसा ताजवीदुल कुराणचाही दौरा केला आणि मुलांशी संवाद साधला.
या भेटीत मदरशामध्ये मुलांशी संवाद साधताना डॉ. उमर म्हणाले, आमचा डीएनए एक असल्याचे भागवत म्हणाले आहेत. केवळ प्रार्थनेच्या पद्धती भिन्न आहेत. भागवत राष्ट्रऋषी आहेत. ते देशाचे राष्ट्रपिता आहेत. एका राष्ट्रपित्याचे येथील आगमन ही आनंदाची बाब आहे. यातून प्रेमाचा संदेश दिला पाहिजे. आम्ही त्यांना निमंत्रित केले म्हणून ते आले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यादरम्यान उमर इलियासी आणि भागवत यांच्यात एक तास बंदद्वार चर्चा झाली.
याच मशिदीत संघटनेचे कार्यालय व इलियासी यांचे निवासस्थानही आहे. भागवत यांच्यासोबत डॉ. कृष्ण गोपाल, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संस्थापक इंद्रेशकुमार आणि रामलालही होते. संघाचे अखिल प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, सरसंघचालक सर्वच क्षेत्रांतील लोकांना भेटतात. हा एक सतत सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे. भागवत यांनी अशातच माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्ट. जनरल जमीर उद्दीन शहा, माजी खासदार शाहिद सिद्दिकी यांचीही भेट घेतली होती.
