ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केला आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटना सीसीटीव्हीत कैद
हल्लेखोर कोण होते हे अद्याप समजू शकले नाही. या हल्लेखोरांनी एमआयएम पक्षाच्या कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारीसह धारदार शस्त्रांनी कार्यालयात बसलेल्या दोन कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तसेच, कार्यालयाचीही तोडफोड केली. काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
दोघे गंभीर जखमी
हल्लेखोरांच्या हल्ल्यात बिलाल काझी आणि फैज मन्सूरी नावाचे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभेचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला.
हल्ल्याबाबत सैफ पठाण यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी माझ्या दोन मित्रांवर हल्ला केला. माझा खून करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला होता. तसेच, माझ्यावर खोटी केस लावत मला कारागृहात पाठविले आणि त्यानंतर मला मारून टाकणार असे काही जण परिसरात बोलत होते, असा आरोपही सैफ पठाण यांनी केला आहे.

दरम्यान, हल्लेखोरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहा ते बारा अज्ञात हातात रॉड, काठ्या घेऊन कार्यालयामध्ये घुसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी कार्यालयात असलेल्या बिलाल या तरूणावर जीवघेणा हल्ला केला. तो या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे. या हल्ल्याप्रकरणी सैफ पठाण यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे.
