राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर त्यांच्या याच वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान यावरुन काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याचं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईन केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, “त्यांच्या या वक्तव्याची आम्हाला भीती नाही. त्यांच्या त्या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असायला पाहिजे. पुन्हा येईन म्हणतायत आणि आलेलेच आहेत. फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून स्वतः बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे यांनी केली पाहिजे.” तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 40 वीर गेले आहेत, त्यांनी देखील याची चिंता केली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये (Chandgad) बोलताना फडणवीस म्हणाले होते की, “मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केले होते.
बारसूवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान याचवेळी बोलताना जयंत पाटील यांनी बारसू वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी चांगल्या कामांना कधीच विरोध करणार नाही. राज्यात नवीन उद्योग आले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे हे सर्व आम्हाला मान्य आहे. मात्र केंद्र सरकारने तयार केलेल्या कामगार कायद्यामुळे कामगारांना संरक्षण राहिलेले नाही. तसेच बारसूमध्ये शेती कसणाऱ्या शेतकऱ्याचे शोषण होऊ नयेत. तसेच या भागात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण केला पाहिजे, हिच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.