अहमदपूर तालुक्यातील मौजे नागठाणा येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध गायक प्रमोद श्रीहरी लोखंडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. प्रमोद लोखंडे यांच्या निधनाने तालुक्यातील एक उत्कृष्ट कलाकार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मौजे नागठाणा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
आपल्या वेगळ्या शैलीतील गायकीनं त्यांनी चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्यांच्या जाण्यानं मराठी संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मौजे नागठाणा सारख्या खेडेगावांमध्ये जन्म झालेल्या आणि कला शाखेतील पदवीधर असलेल्या प्रमोद लोखंडे यांना लहानपणापासून गायनाची आवड होती. या गायनाच्या कलेचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रमोद लोखंडे यांनी गायनाला सुरुवात केली.