निलंग्यात राजकीय दबावापोटी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यास नगरपालिकेकडून टाळाटाळ …धम्मानंद काळे यांचा आरोप
निलंगा,;-भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील कमानिस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास निलंगा नगर पालिका राजकीय दबावापोटी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी केला आहे.
याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की, दि १७मार्च २०२२ रोजी न प प्रशासन मा. जिल्हा सहआयुक्त न. प. प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय लातुर व निलंगा नगर पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा यांच्या कार्यालयास निवेदन देण्यात आले होते.
या संदर्भात २१ मार्च २०२२ रोजी जिल्हा प्रशासन आधिकरी यांनी तातडीचे पत्र काढून सदरील कामाबाबत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश नगर पालिकेस दिले होते.
त्याच प्रमाणे उपविभागीय आधिकरी निलंगा यांनीही कारवाई करण्याचे आदेश ३० ऑगस्ट च्या पत्राद्वारे दिले होते. मात्र याबाबत नगर पालिकेकडून कसल्याही प्रकारची कारवाई झाल्याचे दिसून आले नाही .
याबाबत माहिती अधिकार कायद्याद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता याबाबत माहिती पुरविता येत नाही.
शिवाय या समंधीत कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे,निलंबित करणे ही बाब या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही असे कळविण्यात आलेले आहे.
त्याच प्रमाणे सद्यस्थितीत न. प.ला कायम मुख्याधिकारी आल्याने यांच्यासोबत चर्चा करण्याचा उपविभागीय मॅडम तथा प्रशासक यांच्याकडून सल्ला देण्यात आला आहे.
जवाबदार कार्यालयाकडून समाधान कारक उत्तर न मिळता उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने याप्रकरणी आंबेडकरप्रेमी जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
याप्रकरणी मुख्याधिकारी काय भूमिका व काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
जर मुख्याधिकारी शिंदे यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर दि.२८ ऑक्टोबर २०२२ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा धम्मानंद काळे यांनी दिला आहे.